spot_img
spot_img
spot_img

१६ वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात आरोपीला जन्मठेप

हिंजवडी पोलिसांच्या शास्त्रोक्त तपासाला न्यायालयात यश; १० हजारांचा दंडही ठोठावला

शबनम न्यूज | प्रतिनिधी

तब्बल १६ वर्षांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणाचा तपास शास्त्रोक्त पद्धतीने करून आरोपीविरोधात भक्कम पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात आरोपी सुबोजित बासू याला न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ही घटना १४ एप्रिल २०१० रोजी पहाटेच्या सुमारास शिंदेनगर, पुणे येथील अप्राजिता सोसायटीत घडली होती. आरोपी सुबोजित बासू याने व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याची २३ वर्षीय बहीण प्रियदर्शिनी बासू हिने त्यास विरोध केला. त्यानंतर आरोपीने तिचा गळा दाबून तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

या घटनेप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर.टी. पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने तपास केला. घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार हे प्रकरण ‘स्टार केस’ म्हणून निवडण्यात आले होते. गुन्हे आढावा बैठकीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा वेळोवेळी आढावा घेण्यात आला. त्यानुसार आरोपीविरोधातील न्यायालयीन कार्यवाही प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सरकारी अभियोक्ता अॅड. लिना पाठक यांनी सरकारच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि पोलीस उपनिरीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर करणे, सरकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, सी.ए. अहवाल वेळेत प्राप्त करून घेणे आणि न्यायालयीन कामकाजाचा सातत्याने पाठपुरावा केला.

उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचा विचार करून न्यायालयाने आरोपी सुबोजित बासू याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!