शबनम न्यूज | प्रतिनिधी
गणेशोत्सवातील भक्ती, श्रद्धा आणि उत्साहासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जपत विशालभाऊ वाकडकर सोशल फाउंडेशन यांच्या वतीने वाकड येथे उभारण्यात आलेल्या इको-फ्रेंडली श्री गणेश विसर्जन घाटाला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या अनंत चतुर्दशीपर्यंत तब्बल ७,००० गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
द्रौपदा मंगल कार्यालयाजवळ, कस्तुरी चौक, हिंजवडी रोड, वाकड येथे उभारण्यात आलेल्या या घाटावर घरगुती, सोसायटी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांसाठी पर्यावरणपूरक विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. नदी, नाले, ओढे आणि विहिरी यामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन होऊन जलस्रोतांचे प्रदूषण होऊ नये आणि पर्यावरणाची हानी टाळता यावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
मूर्तीदानातून पर्यावरणासोबत सामाजिक बांधिलकी
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीदानाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. संकलित गणेशमूर्तींचे श्री फाऊंडेशन पुणे यांच्या माध्यमातून संकलन व पुनःशृंगार करण्यात येणार आहे. तसेच मूर्तीदानातून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग अनाथ व गरजू मुलांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात येणार आहे.
त्यामुळे गणरायाला निरोप देताना पर्यावरण संवर्धनासोबत सामाजिक बांधिलकीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
घाटावर भाविकांसाठी आरती व्यवस्था, निर्माल्य कुंड, प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. निर्माल्य कुंडात निर्माल्य जमा करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच गुलाल व रंगांचा वापर टाळून पर्यावरणपूरक विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनालाही गणेशभक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपक्रमाला सहकार्य केले.
“भक्ती जपत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प”
यावेळी विशाल वाकडकर म्हणाले,
“गणरायावरील आपली श्रद्धा ही केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता समाज आणि पर्यावरणाप्रतीच्या आपल्या जबाबदारीतूनही दिसली पाहिजे. भक्ती जपत पर्यावरणाचे रक्षण आणि मूर्तीदानातून गरजू मुलांच्या शिक्षणाला हातभार, हा संदेश घेऊन विशालभाऊ वाकडकर सोशल फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. अनंत चतुर्दशीपर्यंत ७ हजार गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाले, ही या उपक्रमाला मिळालेल्या लोकसहभागाची मोठी पावती आहे.”
ते पुढे म्हणाले, “या संपूर्ण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य करणाऱ्या सर्व पिंपरी-चिंचवडकरांचे, गणेशभक्तांचे, गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. नागरिकांच्या या सहकार्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचवता आला. भविष्यातही पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपणारे असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
विशाल शंकर वाकडकर
प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरदचंद्र पवार




Total Users : 226284