spot_img
spot_img
spot_img

गायक, संगीतकार खंडेराव मुळे यांच्या स्वरयात्रेला रसिकांची दाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भक्तिरचना, भावगीते, नाट्यपदे, गजल…असा विविधरंगी सांगीतिक नजराणा पेश करणाऱ्या प्रसिद्ध गायक, संगीतकार खंडेराव मुळे यांच्या ‘स्वरयात्रा’ या सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद मिळाली.

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिरात गुरुवारी सायंकाळी खंडेराव मुळे यांची संकल्पना आणि आसावरी खंडेराव मुळे यांची निर्मिती असणारा स्वरयात्रा हा कार्यक्रम सादर झाला.

सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी या भक्तिरचनेने खंडेराव मुळे यांनी प्रारंभ केला. मोकळा, खडा आवाज आणि सादरीकरणातील उत्कटता, यामुळे त्यांच्या गीतांनी रसिकांची पकड घेतली. पाठोपाठ बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा अभंग त्यांनी तन्मयतेने सादर केला. पं. भीमसेनजी आणि लता मंगेशकरांनी गायिलेली बाजे रे मुरलिया बाजे, ही रचना टाळ्यांची दाद मिळवणारी ठरली. रे नंदलाला या रचनेलाही पसंती मिळाली. त्यानंतर मुळे यांनी हे बंध रेशमाचे या नाटकातील काटा रुते कुणाला हे शांता शेळके यांनी लिहिलेले आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत व स्वर दिलेले नाट्यपद रंगवले. मालवून टाक दीप आणि शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले या भावगीतांनी रसिकांना आनंद दिला. हिंदी उर्दू रचना तसेच गजल सादर करतानाही मुळे यांनी सहजतेने उच्चारांतील फरक जपले. दयार दिल की, प्यार का पहला खत, मै होश मे था, फिर सावन रूत की, आन मिलो सजना…अशा रचनांचे त्यांनी ढंगदार सादरीकरण केले. मधूनमधून त्यांनी या रचनांवर केलेले भाष्यही लक्षणीय होते. शहर भोगणे, उद्या परवा सुट्टी आहे..या रचना सादर करून त्यांनी या रंगलेल्या स्वरयात्रेची सांगता केली.

खंडेराव मुळे हे दिव्यांग कलाकार आहेत. दृष्टीहीनता असली तरी त्यांनी अमूर्त स्वरांच्या आराधनेचे व्रत जपले आहे. स्वरयात्रेतील अनेक रचनांचे संगीतही खंडेराव मुळे यांनीच दिले होते. गायनासह त्यांनी संगीतकाराची जबाबदारीही उत्तम रीतीने पेलली होती. त्यांना प्रभंजन पाठक (व्हायोलीन), महेशराज साळुंके (तबला), गणेश चाकणकर (पखवाज), शाम यदूर (हार्मोनिअम) तसेच इरा देशपांडे (सहगायन) सदाशिव नलावडे, सत्यजीत वाघमारे, सुनीता आंधळे (कोरस) यांनी अनुरूप साथसंगत केली. प्रा. शैलेश महामुनी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ.. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू ,संयोजन समिती सदस्य श्रीकांत कांबळे, ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांच्या उपस्थितीत स्वरयात्रा सादर करणाऱ्या सर्व कलाकारांचा, वादकांचा सत्कार करण्यात आला.

कृष्णकुमार गोयल यांनी खंडेराव मुळे यांच्या संगीतसाधनेचे कौतुक केले. लौकिक अर्थाने दृष्टीदोष असला तरी मुळे यांनी संगीतसेवा अखंडित सुरू ठेवली आहे, असे ते म्हणाले.
अंधमुक्त पुणे या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुळे यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!