spot_img
spot_img
spot_img

भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप; संदीप वाघेरे यांच्या विसर्जन व संकलन केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण पर्वाची सांगता होत असताना पिंपरी परिसरातील नागरिकांनी आपल्या लाडक्या गणरायाला साश्रू नयनांनी भक्तिपूर्ण वातावरणात निरोप दिला. संदीप वाघेरे यांच्या पुढाकारातून सलग सहाव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या गणेश मूर्ती विसर्जन व संकलन केंद्राला यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या केंद्रावर तब्बल ३,८५३ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देत नागरिकांना गणेशमूर्तींचे श्रद्धापूर्वक व सुरक्षित पद्धतीने विसर्जन करता यावे, तसेच नदी, नाले व जलस्रोतांचे प्रदूषण टाळता यावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विसर्जन केंद्रावर दोन विसर्जन हौद, गणरायाच्या आरतीसाठी व्यवस्था, साउंड सिस्टीम, पिण्याचे पाणी, निर्माल्य संकलन, सुरक्षा आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना कोणतीही गैरसोय न होता भक्तिभावाने गणरायाला निरोप देता आला.

विसर्जनासाठी आलेल्या प्रत्येक गणेशभक्ताच्या चेहऱ्यावर बाप्पाला निरोप देण्याची हुरहूर आणि भक्तिभाव दिसून येत होता. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

गणेश विसर्जनाच्या काळात नागरिकांची सुरक्षितता, स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षण याला विशेष प्राधान्य देण्यात आले. ३,८५३ गणेशमूर्तींचे विसर्जन आणि मोठ्या प्रमाणात निर्माल्याचे संकलन करत हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

“गणरायाच्या भक्तीबरोबरच पर्यावरणाची जपणूक आणि नागरिकांची सुविधा यांचा समन्वय साधणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. गेल्या सहा वर्षांपासून नागरिक या उपक्रमाला सातत्याने देत असलेला प्रतिसाद हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे,” असे संदीप वाघेरे यांनी सांगितले.

नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ३,८५३ गणेशमूर्तींचे विसर्जन करत यंदाचा गणेश विसर्जन सोहळा भक्तिमय, शिस्तबद्ध, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वातावरणात संपन्न झाला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!