लोखंडी स्ट्रक्चरसह जाहिरात फलक निष्कासित; परवानगीशिवाय फलक उभारल्यास तातडीने कारवाईचा इशारा
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. ताथवडे रोड परिसरातील विष्णुदेव नगर, पुनावळे येथे उभारण्यात आलेला ४० बाय ३० फुटांचा अनधिकृत जाहिरात फलक महापालिकेने मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) लोखंडी स्ट्रक्चरसह निष्कासित केला. उपआयुक्त (परवाना) राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरात खासगी जागेत जाहिरात फलक उभारण्यासाठीही महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २४४ व २४५ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्ह व स्कायसाईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण नियम, २०२२ मधील तरतुदींनुसार ही परवानगी बंधनकारक आहे.
मात्र, शहरात महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक उभारले जात असल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण होत आहे. तसेच महापालिकेच्या महसुलाचेही नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून अनधिकृत जाहिरात फलकांची स्थळपाहणी करून ते निष्कासित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
यापूर्वी ताथवडे येथील अनधिकृत जाहिरात फलक, थरमॅक्स चौकातील समर्थ सहकारी बँकेच्या इमारतीवरील जाहिरात फलक आणि चोवीसावाडी येथील काळीभित रोडवरील सर्व्हे क्रमांक १७५/९ मधील अनधिकृत जाहिरात फलकांवरही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिकेने सर्व जाहिरात एजन्सींना स्पष्ट इशारा दिला आहे की, शहरात यापुढे अनधिकृत जाहिरात फलक उभारू नयेत. विनापरवाना जाहिरात फलक आढळल्यास ते तातडीने निष्कासित करण्यात येतील. त्यामुळे जाहिरात एजन्सींनी नियमांचे पालन करूनच जाहिरात फलक उभारावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.




Total Users : 224928