शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतीय समाजव्यवस्थेचा तपशिलाने अभ्यास करून, जातींची विषमता दूर करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी आयुष्यभर जो संघर्ष केला आणि जो लढा दिला, त्याचे अत्यंत प्रत्ययकारी सादरीकरण ‘सत्यशोधक महात्मा’ या नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने प्रेक्षकांनी अनुभवले. मूळ ताकदीचे लेखन, नेमकी रंगावृत्ती, जाणते दिग्दर्शन आणि कलाकारांचा अप्रतिम अभिनय, यामुळे हा प्रयोग अविस्मरणीय ठरला.
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी सायंकाळी ‘सत्यशोधक महात्मा’ हे नाटक सादर झाले. महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संवाद, पुणे तर्फे सुनील महाजन यांनी सादर केले असून, गौरी राहुल ढोले पाटील आणि निकिता मोघे या निर्मात्या आहेत. डॉ. रवी चौधरी आणि केतकी बोरकर यांचे निर्मिती साह्य मिळाले आहे. नाटकात गणेश इनामदार, अरुंधती कामठे, गायत्री वाडकर, दिलीप आंग्रे, वसंत भडके, आय़ुष वाघ, ओंकार मोहिते यांनी भूमिका साकारल्या आहेत. काल झालेल्या प्रयोगापूर्वी या सर्व मान्यवरांचा गौरव पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ.. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कमलताई ढोले पाटील, पूना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील, फुले वसतिगृहाचे विश्वस्त अरुण कुदळे यांचाही सन्मान करण्यात आला.
निर्मात्या गौरी ढोले पाटील म्हणाल्या, ‘महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त हे नाटक पुन्हा सादर करत आहोत. फुले यांचे विचार कालातील असून, समाजातील सर्व घटकांसाठी सामाजिक समतेचा संदेश त्यांनी दिला आहे.
कृष्णकुमार गोयल यांनी फुले यांचा समतेचा विचार सर्वत्र पोहोचण्यासाठी नाटकाचे माध्यम प्रभावी ठरेल, असे मत मांडले.
नाटकाचे मूळ लेखन प्रसिद्ध लेखक रामनाथ चव्हाण यांचे असून, रंगावृत्ती आणि दिग्दर्शन योगेश सोमण यांचे आहे. सामाजिक समता, स्त्रीशिक्षण, तसेच वंचितांच्या हक्कांसाठी फुले यांनी केलेले लोकोत्तर कार्य या नाटकातून प्रेक्षकांसमोर आले. नाटकात वापरण्यात आलेले ज्योतिबांचे अखंड (अभंग) प्रभावी ठरले आणि वेळोवेळी प्रेक्षकांनी या अखंड सादरीकरणाला दाद दिली. स्वतः उत्तम शिक्षण प्राप्त केल्यावर, सामाजिक विषमतेविरोधात ज्योतिबांनी दिलेला लढा, विचारलेले प्रश्न, केलेला संघर्ष आणि अखंड या माध्यमातून व अन्य लेखनातून सातत्याने केलेला वैचारिक प्रचार-प्रसार…या संघर्षाचे कौटुंबिक जीवनावर झालेले परिणाम, मतभेद यांचेही दर्शन नाटकातून घडले. स्त्रीशिक्षणाचे त्यांना पटलेले महत्त्व, त्यासाठी घरच्या स्त्रीला आधी शिक्षित करण्याचा निर्मय, काशीबाईंचा प्रसंग, पेठांमध्ये पोस्टर लावणे, यशवंतला दत्तक घेण्याचा निर्णय, सत्यशोधकची स्थापना….या सर्वच टप्प्यांवरचे ज्योतिबा या नाटकांतून प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेला जागृत करतात आणि आजच्या पिढीलाही नव्याने उमगत जातात. सुटसुटीत नेपथ्य आणि अखंड रचनांचा वापर नेमकेपणाने केल्याने नाटकाचा आशय आणि संदेश अधोरेखित होतात.




Total Users : 224870