शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असताना बेकायदेशीररीत्या लोखंडी धारदार कोयता बाळगणाऱ्या २९ वर्षीय तरुणाला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले. जाधववाडीतील सेक्टर १६, भाजी मंडईजवळील मोकळ्या मैदानात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार संतोष झावरे (वय २९, रा. पंतनगर, जाधववाडी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, २० सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास जाधववाडीतील सेक्टर १६ परिसरात पोलीस गस्त घालत होते. यावेळी भाजी मंडईजवळील मोकळ्या मैदानात एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला.
पोलिसांनी त्याची चौकशी करून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी धारदार कोयता आढळून आला. पोलिसांनी तात्काळ हा कोयता ताब्यात घेतला. शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असताना संबंधित तरुणाने बेकायदेशीररीत्या धारदार शस्त्र जवळ बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्र बाळगण्यास मनाई असतानाही आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ओंकार झावरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तरुणाने कोयता कोणत्या कारणासाठी जवळ बाळगला होता, तो कुठून आणला आणि त्याचा वापर करण्याचा काही हेतू होता का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. तसेच त्याच्याविरुद्ध यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहेत का, याचीही माहिती घेतली जात आहे.
शहरात बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत




Total Users : 224822