वाकडच्या भगवती रॉयल सोसायटीचा सामाजिक एकतेचा आदर्श; १२८ फ्लॅट्सचा ‘एक सोसायटी, एक गणपती’ उपक्रम १२ वर्षांपासून अखंडित
पिंपरी-चिंचवड : लोकमान्य टिळकांच्या ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेला आधुनिक काळाची जोड देत वाकड-थेरगाव परिसरातील भगवती रॉयल हौसिंग सोसायटीने सामाजिक एकता, पर्यावरण संवर्धन आणि वैचारिक समृद्धीचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. तब्बल १२८ फ्लॅट्समधील रहिवाशांना एका कुटुंबाच्या धाग्यात गुंफणारी ‘एक सोसायटी, एक गणपती’ ही संकल्पना सोसायटीने गेल्या १२ वर्षांपासून यशस्वीपणे जपली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक पुष्पगुच्छांऐवजी पाहुण्यांना प्रेरणादायी पुस्तकांची भेट, मुलांना गोष्टींच्या पुस्तकांचे बक्षीस, ‘AI 360’ या आधुनिक तंत्रज्ञानावरील व्याख्यानासह पर्यावरणपूरक विसर्जन अशा विविध उपक्रमांनी उत्सवाला सामाजिक आणि वैचारिक अधिष्ठान दिले.

‘फ्लोअर होस्ट’ संकल्पनेतून प्रत्येक रहिवाशाला यजमानपद!
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात प्रत्येक रहिवाशाचा सक्रिय सहभाग असावा, यासाठी सोसायटीने २०१६ मध्ये ‘फ्लोअर होस्ट’ ही अभिनव संकल्पना सुरू केली. या उपक्रमांतर्गत प्रत्येक मजल्याला एका दिवसाचे यजमानपद दिले जाते. त्या दिवशी आरती, पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी संबंधित मजल्यावरील रहिवासी आनंदाने सांभाळतात. त्यामुळे उत्सवाच्या नियोजनाचा भार मोजक्या व्यक्तींवर पडत नाही, तर प्रत्येक कुटुंबाला उत्सवाचा अविभाज्य भाग होण्याची संधी मिळते. गेल्या १२ वर्षांपासून वर्षभरातील तब्बल १० विविध सण-उत्सव एकत्र साजरे करत सोसायटीने सामूहिक सहभागाची ही परंपरा अधिक दृढ केली आहे.
बुकेऐवजी पुस्तकांची भेट; ज्ञानसंस्कृतीला प्रोत्साहन
यंदाच्या उत्सवातील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे पाहुण्यांच्या स्वागतासाठी फुलांच्या बुकेऐवजी पुस्तकांची भेट देण्याचा उपक्रम! ‘अजित पर्व’, ‘शिव नीती’ आणि ‘जिज्ञासा’ यांसारख्या वैचारिक व प्रेरणादायी पुस्तकांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. केवळ स्वागतापुरताच हा उपक्रम मर्यादित न ठेवता, विविध स्पर्धांतील विजेत्या चिमुकल्यांना प्रोत्साहन म्हणून स्टोरी बुक्स भेट देण्यात आली. उत्सवाच्या आनंदासोबत वाचनसंस्कृती रुजविण्याचा हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरला. या उपक्रमासाठी हार्ट पब्लिकेशनचे प्रकाशक व लेखक विनोद शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा १२ वर्षांचा संकल्प!
गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे भान जपण्याची परंपराही भगवती रॉयल सोसायटीने सातत्याने कायम ठेवली आहे. गेल्या १२ वर्षांपासून सोसायटीत कागदाचा लगदा आणि शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. विसर्जनासाठी बाहेरील जलस्रोतांवर अवलंबून न राहता सोसायटीच्या आवारातच विसर्जन केले जाते. त्यानंतर विसर्जनाचे पाणी स्वच्छ करून झाडांसाठी वापरले जाते. भक्ती, पर्यावरण संवर्धन आणि संसाधनांचा पुनर्वापर यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधला जात आहे.
गणेशोत्सवात ‘AI 360’चा आधुनिक जागर
परंपरेसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत यंदा सोसायटीने ‘AI 360’ अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले. डॉ. अमोल पाटील आणि विजय उमरगेकर यांनी रहिवाशांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे बदलते स्वरूप, भविष्यातील तंत्रज्ञानाच्या संधी आणि दैनंदिन जीवनातील AI चा वापर याविषयी मार्गदर्शन केले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या व्यासपीठावर भक्तीबरोबरच ज्ञान आणि तंत्रज्ञानाचीही मेजवानी अनुभवायला मिळाली.
सोसायटीतील स्वयंसेवकांच्या मेहनतीतून उत्सवाला भव्यता
भगवती रॉयल सोसायटीच्या गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाहेरील व्यावसायिक एजन्सीवर अवलंबून न राहता सोसायटीतील स्वयंसेवकच उत्सवाचा देखावा, सजावट, रोषणाई आणि स्टेज उभारणीची जबाबदारी सांभाळतात. सामूहिक श्रमदान आणि स्वयंप्रेरणेतून उभा राहणारा हा उत्सव रहिवाशांच्या एकजुटीचे प्रतीक ठरत आहे.
यंदाच्या उत्सव मंडळाचे अध्यक्ष मयूर पवार, उपाध्यक्ष उमेश पेंढभाजे, खजिनदार चिंतन कंसारा, तसेच मनोज चौधरी, सतीश कोलगे आणि सुनील आचरे यांनी उत्सवाच्या यशस्वी नियोजनासाठी विशेष मेहनत घेतली. सोसायटीचे अध्यक्ष मुकेश बाफना, सेक्रेटरी रवींद्र निकम आणि खजिनदार रवींद्र उत्तेकर यांच्यासह संपूर्ण कमिटीचे सहकार्य लाभले. स्वयंसेवक आणि ‘Zen G’ यांनीही उत्सवाच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले.
एकता, पर्यावरण संवर्धन, वाचनसंस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर मिलाफ साधणारी भगवती रॉयल सोसायटीची गणेशोत्सव परंपरा इतर हौसिंग सोसायट्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. उत्सवातील या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती सोसायटीचे हितचिंतक रहिवासी योगेश पाटील यांनी प्रसिद्धिमाध्यमांना दिली.




Total Users : 224755