spot_img
spot_img
spot_img

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत रसिकांनी अनुभवली ‘कावेरी परंपरा’

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 शास्त्रीय संगीतासह ललित संगीतप्रकारांचे गायन, वाद्यवादनातील नैपुण्य आणि नृत्याची पेशकश, अशी विद्यार्थ्यांची सादरीकरणे रविवारी रसिकांनी ‘कावेरी परंपरा’ या कार्यक्रमांतून अनुभवली. कलाक्षेत्रातील मान्यवर कलाकारांची उपस्थिती, हे या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य ठरले.
मंत्रमुग्ध करणारी प्रस्तुती
अधिश्री पोटे या विद्यार्थिनीने राग मधुवंती सादर केला. तिलवाडा तालात अब मान मना हरी हा ख्याल आणि द्रुत त्रितालातील कैसी होरी खेलत है नंदलाल ही रचना गायिली. तिला कौशिक केळकर (तबला) आणि अदिती गराडे (हार्मोनिअम) यांनी साथ केली.
नील चापेकरने यमन रागात मध्यलय त्रितालातील ख्याल आणि मन राम रंगी रंगले हे नाट्यपद सादर केले. चिन्मय लेले (तबला) आणि श्रुती आकार (हार्मोनिअम) यांनी साथ केली.
श्रुती राऊतने व्हायोलीनवर राग जोगमध्ये सजन मोरो घर आये ही रचना आणि राजस्थानी धून ऐकवली. तिला शंकर कुचेकर यांनी तबल्यावर साथसंगत केली.
सायेषा चौधरीने एकल तबलावादन करताना एकताल सादर केला. पेशकार, कायदे, चक्रधार परण तिने तयारीने वाजवले. लेहरासाथ श्रुती आकारने केली.
जान्हवी भागवत आणि मैत्रेयी कुलकर्णी यांनी भरतनाट्यम आणि कथक नृत्याचे युगुल सादरीकरण केले. हनुमान स्तवन हा कथाभाग त्यांनी प्रस्तुत केला. पंतुवराली रागात आणि आदीतालात निबद्ध रचना त्यांनी सादर केली.
या विद्यार्थ्यांची कलाविश्वातील ही सुरवातीची पावले अतिशय आश्वासक असल्याची खात्री पटवणारे त्यांचे सादरीकरण होते. प्रस्तुती करताना आत्मविश्वास आणि कलेचा स्वतः आनंद घेणे, विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

विद्यार्थ्यांचे कौतुक करताना, विदुषी शमा भाटे, विदुषी सुचेता चापेकर यांनी कावेरी परंपरा या उपक्रमाचे लक्षणीय योगदान सांगितले. भरत कामत आणि आनंद भाटे यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. संगीत शिक्षक अपर्णा लेले यांनी संयोजन केले. स्नेहल कुलकर्णी आणि अश्विनी देवधऱ यांनी सूत्रसंचालन केले.

 

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत रविवारी सायंकाळी कन्नड संघाच्या कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने आणि प्रभावी सादरीकरणाने कावेरी परंपरा हा कार्यक्रम रंगत गेला. ज्येष्ठ नृत्यगुरू आणि संरचनाकार विदुषी शमा भाटे, विदुषी डाॅ. सुचेता भिडे चापेकर, तबलावादक पं. भरत कामत आणि गायक आनंद भाटे हे कलाकार कावेरी परंपरा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. पुणे फेस्टिव्हलच्या चेअरपर्सन मीरा सुरेश कलमाडी, श्रीधर कलमाडी, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व कलाकारांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, उपाध्यक्ष इंदिरा सालियन, सचिव मालती कलमाडी, सुमती श्रीनिवासन, पल्लवी नाईक या मान्यवरांचाही सन्मान कृष्णकुमार गोयल आणि डाॅ. सतीश देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

गोयल म्हणाले, ‘पुणे फेस्टिव्हलची मुहूर्तमेढ माजीकेंद्रीयमंत्री व पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी ३७ वर्षांपूर्वी रोवली आणि आज हा फेस्टिव्हल शहराच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय ख्यातीचा झाला आहे. सातत्यपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे. त्यामुळे कलमाडी यांच्या स्मृतींना हा फेस्टिव्हल यंदा अर्पण करण्यात आला आहे. त्यांच्या योगदानाचे स्मरण म्हणून विशेष पुरस्कारही सुरू केला आहे. कावेरी परंपरा या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकलाकारांचे उत्तम सादरीकरण होत आहे. विद्यार्थ्यांना कलाप्रस्तुतीसाठी व्यासपीठ मिळत आहे. यानिमित्ताने मला पालकांना आवाहन करावेसे वाटते, की आपल्या मुलांची कुणाशी तुलना करू नका. प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, वेगळे आहे, हे लक्षात घेऊन, चांगल्या गोष्टींचे कौतुक करा, दाद द्या. त्यांना स्वप्ने बघायला शिकवा, ती नक्की भरारी घेतील, यावर विश्वास ठेवा.

मालती कलमाडी यांनी कावेरी परंपरा या सादरीकरणाची संकल्पना स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अवसर मिळावा, यासाठी विमला राव आणि रजनी पाच्छापूर यांनी विशेष प्रयत्न केले. पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रमापलीकडे असणारे कलेचे विश्व विद्यार्थ्यांनी आपलेसे करावे, ही दूरदृष्टी या शिक्षिकांनी ठेवून, कलाध्यापन केले. कावेरी परंपरा हे त्याचेच मूर्त रूप आहे. भारतीय कलापरंपरेचा वारसा मोठा आहे. पिढ्यांमागून पिढ्या कलापरंपरेचे पालन, जतन आणि संवर्धन होत आले आहे. गुरु-शिष्य परंपरेच्या माध्यमातून हा वारसा पुढे नेला जात आहे. या परंपरेला कृतज्ञतेची किनार आहे. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहावी, याच उद्देशाने कावेरी परंपरेचे सादरीकरण आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!