ड प्रभागातील केंद्रासाठी जागा तातडीने हस्तांतरित करा; वाहनांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवा – विठ्ठल उर्फ नाना काटे
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात उभी राहत असलेली गृहसंकुले, व्यावसायिक आस्थापना आणि उंच इमारतींची वाढ लक्षात घेता शहरातील अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ड प्रभागांतर्गत नवीन अग्निशमन केंद्र उभारण्याच्या कामाला तातडीने गती देण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे.
नवीन अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक असलेली जागा तातडीने हस्तांतरित करून त्यानंतरच्या प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात याव्यात. केंद्राचे बांधकाम निर्धारित कालावधीत पूर्ण करून ते लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित करावे, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.
शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच गृहसंकुल आणि उंच इमारतींची संख्या वाढत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाला जलद प्रतिसाद देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नवीन अग्निशमन केंद्र कार्यान्वित झाल्यास संबंधित परिसरातील नागरिकांना आगीच्या घटना तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितीत अधिक जलद आणि प्रभावी सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे नाना काटे यांनी म्हटले आहे.
विद्यमान केंद्रावर वाहनांची संख्या वाढविण्याची मागणी
ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सध्या कार्यरत असलेल्या अग्निशमन केंद्रावरही आवश्यकतेच्या तुलनेत अग्निशमन वाहनांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे काटे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. एखाद्या आपत्कालीन घटनेच्या वेळी उपलब्ध वाहन अन्य ठिकाणी पाठविण्यात आल्यास संबंधित केंद्रावर वाहन उपलब्ध नसण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे या केंद्रावर आवश्यक संख्येने अग्निशमन वाहने कायमस्वरूपी उपलब्ध ठेवण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवा
केवळ वाहने वाढवून उपयोग होणार नसून, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित अग्निशमन केंद्रावर अग्निशमन अधिकारी, जवान आणि इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे. उपलब्ध वाहनांचा प्रभावी वापर करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन अग्निशमन केंद्राचे काम तसेच विद्यमान केंद्राची क्षमता वाढविण्याच्या बाबींकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहावे. वाहन व मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही, यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी आणि नवीन अग्निशमन केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.




Total Users : 224365