तीन दिवसांच्या सांस्कृतिक मेजवानीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच वर्षी महोत्सवाने उमटवला ठसा
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील कला, संस्कृती, नाट्य, संगीत आणि मनोरंजन क्षेत्राला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चा समारोप मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. १८, १९ आणि २० सप्टेंबर या तीन दिवसांत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. महोत्सवातील विविध कार्यक्रमांना शहरातील रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत भरभरून दाद दिली.
या महोत्सवाचे उद्घाटन १८ सप्टेंबर रोजी करण्यात आले. महापौर रवी लांडगे, आमदार अमित गोरखे आणि विरोधी पक्षनेते तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संयोजनातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पहिल्याच वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद आयोजकांसाठी उत्साह वाढविणारा ठरला.
१८ सप्टेंबर रोजी शोभायात्रेने महोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर विविध सांस्कृतिक, नाट्य आणि संगीत कार्यक्रमांनी महोत्सवातील वातावरण रंगतदार केले. गणेश वंदना, ‘एकदा पहावं करून’, ‘कुटुंब कीर्तन’, नाटक, ऑर्केस्ट्रा, पंचम मूर्ती, मनोज सेठिया ऑर्केस्ट्रा, लावणी कार्यक्रम, मानसी रिस्कोर रॉकबँड, ‘आशा द वर्सटाइल लीजेंड’, ‘अक्षरक्षर तुझेच आहे’, ‘अंतर्नाद’, ‘परंपराशील महाराष्ट्र’ अशा विविध कार्यक्रमांनी मुख्य रंगमंचावर रंगत आणली.
विशेष म्हणजे अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर यांच्या ‘बॉलिवूड ऑल टाइम हिट्स’ या कार्यक्रमालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध कलाप्रकारांची सांगड घालत सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे तीनही दिवस महोत्सवाचे वातावरण सांस्कृतिक उत्साहाने भारलेले होते.

मोरया गोसावी रंगमंचावरही विविध कार्यक्रम :
मुख्य रंगमंचाबरोबरच मोरया गोसावी रंगमंचावर देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक कलाकार, सांस्कृतिक संस्था आणि विविध कलाप्रकारांना या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले. या कार्यक्रमांनाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचा उत्साह वाढविला.
तीन दिवसांच्या या सांस्कृतिक पर्वाची सांगता २० सप्टेंबर रोजी रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समारोप समारंभाने झाली. यावेळी महोत्सवाचे संयोजक आमदार अमित गोरखे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ अभिनेते सुहास जोशी, गौरी लोंढे आणि गजाला सय्यद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, “या महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही एक बीज रोवले आहे. पुढील वर्षात हे बीज निश्चितच मोठ्या स्वरूपात फुलेल आणि त्याचा लाभ अनेक कलाकारांना मिळेल.”
भाऊसाहेब भोईर यांनीही महोत्सवाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, “सर्वांच्या मेहनतीने आणि संयोजकांच्या नियोजनातून हा सोहळा यशस्वी झाला आहे. पुढील वर्षी हा महोत्सव आणखी मोठ्या स्वरूपात कसा आयोजित करता येईल, याबाबत निश्चितच चर्चा करू.”
पहिल्याच वर्षी विविध कलावंत, कलाकार आणि रसिकांना एकत्र आणत ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ने शहराच्या सांस्कृतिक विश्वात नवा अध्याय सुरू केला आहे. तीन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि कलाकारांना मिळालेले व्यासपीठ पाहता, आगामी काळात या महोत्सवाचा विस्तार करण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.
विविध कलाप्रकार, मनोरंजन, नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शहरवासीयांना दर्जेदार सांस्कृतिक अनुभव देत अखेर २० सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात या महोत्सवाची सांगता झाली.




Total Users : 224365