एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना आहे. अशा प्रदर्शनात माझेही फोटो असायचे. हे प्रदर्शन औचित्यपूर्ण आहे कारण दोनशे वर्षांपूर्वी १८२६ मध्ये पहिला फोटो क्लिक झाला होता. अशा प्रदर्शनांच्या उपक्रमातून फोटो साक्षरता वाढीस लागेल अशी भावना ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार व वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या जीवनावर आधारित प्रदर्शित झालेला ‘फ्रेम’ चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम पटवर्धन यांनी आज व्यक्त केली. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन बालगंधर्व कलादालन येथे त्यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस हिरा सरवदे, पुणे फेस्टिव्हल सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू, पुणे फेस्टिव्हल कलादालन समन्वयक सचिन आडेकर मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले की, ‘या प्रदर्शनात उत्तमोत्तम आणि निवडक छायाचित्रे आहेत. विषयांचेही वैविध्य आहे. पुढील वर्षीपासून हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात करू अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्य असणाऱ्या दैनिकांच्या छायाचित्रकारांनी गेल्या वर्षभरात काढलेल्या न्यूज फोटोंचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात शनिवार दि. १९ सप्टेंबर व रविवार दि. २० सप्टेंबर या दोन दिवशी सकाळी १०.०० ते रात्री ८.०० यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. १२x१८ इंच आकाराच्या प्रिंट स्वरूपातील सुमारे २५० हून अधिक छायाचित्रे या प्रदर्शनात असतील. पत्रकार संघाचे सरचिटणीस हिरा सरवदे आणि राहुल देशमुख यांनी समन्वयक म्हणून काम पहिले. या फोटो प्रदर्शनातील पहिल्या तीन उत्तम छायाचित्रांना अनुक्रमे दहा हजार रुपये, सात हजार रुपये व पाच हजार रुपये आणि उत्तेजनार्थ एक अशी बक्षिसे पुणे फेस्टिव्हल तर्फे दिली जाणार आहेत. बालगंधर्व कलादालनचे पुणे फेस्टिव्हलचे समन्वयक सचिन आडेकर, आबा जगताप, अन्वर शेख हे उपस्थित होते.




Total Users : 238506