साडेपाच लाखांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई; ६३ कोटी ७८ लाखांचा दंड वसूल
पिंपरी-चिंचवड : शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी २०२६ मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात धडक कारवाई केली आहे. वर्षभरात आतापर्यंत तब्बल ५ लाख ७२ हजार १८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, या कारवाईतून तब्बल ६३ कोटी ७८ लाख ४७ हजार ६५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
शहरातील वाढती वाहतूक, नियमांचे उल्लंघन आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने वाहतूक पोलिसांनी विविध नियमभंगांविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत विनाहेल्मेट वाहन चालविणे, फॅन्सी किंवा नियमबाह्य नंबर प्लेट, वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणे तसेच मॉडिफाइड सायलेन्सरचा वापर करणाऱ्या वाहनचालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच गंभीर स्वरूपाचे नियमभंग करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार पुढील कारवाई केली जात आहे. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या काही वाहनचालकांचे वाहनचालक परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहेत.
वाहतूक नियम हे केवळ दंड आकारण्यासाठी नसून, रस्त्यावरील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, वाहनांवर नियमबाह्य नंबर प्लेट किंवा काळी काच वापरू नये तसेच वाहनांमध्ये अनधिकृत बदल करू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
शहरातील वाहतूक शिस्त कायम ठेवण्यासाठी आगामी काळातही नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




Total Users : 223825