नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; अग्निशमन दलाचे जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य
पिंपरी-चिंचवड : शहरातील गणेशम फेज-२ सोसायटीमध्ये अचानक आग लागल्याची थरारक घटना घडली. आगीची माहिती मिळताच नगरसेवक श्री. शत्रुघ्न काटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. दरम्यान, आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या एका खोलीत दोन चिमुरडी अडकून पडल्याचे समोर आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने बचावकार्य करत दोन्ही मुलींची सुखरूप सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधत तातडीने मदत मागवली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन लहान मुली खोलीत अडकल्याची माहिती मिळताच जवानांनी कोणतीही पर्वा न करता बचावकार्य सुरू केले आणि दोन्ही चिमुरड्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
या घटनेवेळी नगरसेविका सौ. अनिताताई काटे आणि नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे देखील घटनास्थळी उपस्थित होत्या. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत बचावकार्याला सहकार्य केले.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे नेमके किती नुकसान झाले, याची माहितीही पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची तत्परता आणि अग्निशमन दलाच्या जवानांची वेगवान कारवाई यामुळे दोन चिमुरड्यांचे प्राण वाचले असून, मोठा अनर्थ टळला आहे.




Total Users : 223730