पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेला दोन महिने झाल्यानंतरही शहरातील कचराकोंडी कायम आहे. शहराच्या विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेला दोन महिने झाल्यानंतरही शहरातील कचराकोंडी कायम आहे. शहराच्या विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मोशी डेपोवर कचऱ्याची गाडी खाली करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे कचऱ्याची परिस्थिती बिकट असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. दरम्यान, शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी अद्याप जागांची निश्चिती केल्याचे प्रशासनाने जाहीर केलेले नाही. मोशी कचरा डेपोमध्ये आठ जुलै रोजी कचऱ्याचा डोंगर अनधिकृत इमारतीवर कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाला, तर बारा कामगार जखमी झाले. त्यामुळे कचरा डेपो बंद होता. महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात खडकी कटक मंडळाच्या कासारवाडीतील शंकरवाडी येथील जागेत आणि देहूरोड मंडळाच्या निगडीजवळील जुन्या कचरा डेपोच्या जागेत कचरा टाकण्यास सुरुवात केली होती. त्यांनी आठच दिवसांत कचरा टाकण्यास मनाई केली.
त्यामुळे महापालिकेने – शहरातील मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकला होता. मोकळे मैदान, रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. काही दिवसांपूर्वी मोशी डेपोत कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतरही शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलण्यात आला नाही. शहरात कचराकोंडी कायम असल्याने नागरिकांसह नगरसेवकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. दहा कचरा प्रक्रिया केंद्र प्रस्तावित दहा क्षेत्रीय कार्यालयात एक असे एकूण दहा कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले होते. दोन महिने उलटूनही अद्याप एकही केंद्र सुरू करण्यात आले नाही.
मागील आठवड्यातच केंद्रांसाठीच्या जागांची घोषणा करण्याची ग्वाही आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत मोशीतील नगरसेवकांना दिली होती. परंतु, अद्याप जागांची घोषणा झाली नाही. पर्यायी कचरा डेपोबाबत मौन संपूर्ण शहराचा कचरा मोशी कचरा डेपोत टाकला जातो. या डेपोची क्षमता संपली आहे. त्यामुळे शहरात पुनावळे येथील वन विभागाच्या जागेत पर्यायी कचरा डेपोचे आरक्षण टाकण्यात आले होते. महापालिकेने प्रारूप विकास आराखड्यात हे आरक्षण उठविले आहे. आराखडा अंतिम करताना हे आरक्षण कायम ठेवण्याची भोसरीतील नगरसेवकांची मागणी आहे. मात्र, यावर अद्याप प्रशासनाने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.
मोशी डेपोत कचरा टाकण्यास वेळ लागत आहे. शहरात कोठेच नव्याने कचरा टाकला जात नसून, पूर्वी साचलेला कचरा तीन दिवसांत उचलण्यात येईल. त्यासाठी वाहनांची संख्या वाढविली – असून, रात्रीही कचरा उचलला जात आहे. कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी तात्पुरत्या स्वरूपात जागांची – निश्चिती करून यादी आयुक्तांकडे दिली आहे. तांत्रिक बाजू तपासून तेथे कचरा प्रक्रिया केंद्र सुरू केले जातील, असे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले.
आरोग्य विभागाकडून रस्ते व पदपथावरील कचरा उचलला जात आहे. त्यानुसार आवश्यक प्रमाणात वाहनांची संख्या वाढवण्यात येत आहे. गणेशोत्सवात संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.










Total Users : 221661