spot_img
spot_img
spot_img

आडकर फौंडेशनतर्फे विश्र्वेश कुलकर्णी यांचा जिद्द जीवन गौरव पुरस्काराने गौरव

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, भगवान बसवेश्र्वर होऊन गेले. तत्त्वज्ञानात्मक दार्शनिकतेचा संबंध सत्तेशी आहे. हे तत्त्वज्ञान आजची पिढी पेलू शकेल का असा प्रश्न आहे. शांततेचे तत्त्वज्ञान पेलण्यासाठी पोटाची भूक शांत होणे आवश्यक आहे. अशा काळात यशस्वी ग्रुपच्या माध्यमातून माणुसकीचे वकील असणाऱ्या विश्र्वेश कुलकर्णी यांनी तयार केलेले ‘शिका व कमवा’ हे महाराष्ट्रीय मॉडल कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्‌गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
आडकर फौंडेशनतर्फे शिका व कमवा या योजनेद्वारे आर्थिक दुर्बल घटकातील तरुणांना स्वावलंबी शिक्षण रोजगाराचा मार्ग दाखविणारे यशस्वी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विश्र्वेश कुलकर्णी यांचा आज (दि. २६) डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते जिद्द जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यावेळी डॉ. सबनीस बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे अध्यक्षस्थानी होते. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

विश्र्वेश कुलकर्णी यांचे नेतृत्व देशव्यापी व्हावे, अशा सदिच्छा देऊन डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, कुलकर्णी यांनी अभिनव योजनेद्वारे पुण्य पेरले, विद्यार्थी घडविले, त्यांच्यात आत्मविश्वास, जिद्द जागविली आणि त्यांच्यातील जिद्दिच्या कर्तृत्वातून अनेक कुटुंबे उभी केली. त्यांचे हे कार्य माणुसकी, देशनिष्ठा जागविणारे आहे.

अध्यक्षपदावरून बोलताना भारत सासणे म्हणाले, विश्र्वेश कुलकर्णी यांचे काम देशाला दिशा देणारे आहे. तरीही त्याची दखल शासन पातळीवर घेतली जात नाही. आजच्या तरुणाईच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मोठ्या कोलाहलाचा देशाला सामना करावा लागेल.

सत्काराला उत्तर देताना विश्र्वेश कुलकर्णी म्हणाले, नोकरी करायची नाही असा निश्चय करून अनेक उद्योग केले. अडचणींना सामोरे जावे लागल्यामुळे त्यातून शिकायलाही मिळाले. स्पर्धेत टिकायचे आणि पुढे जायचे याच निश्चयाने कार्यरत राहिलो. मिळेल ती संधी स्वीकारत गेलो. माझ्या जिद्दीला अनेकांनी साथ दिली. आर्थिक परिस्थितीमुळे शिकू न शकणाऱ्या मुलांसाठी काही पर्याय नसल्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी वाट निर्माण केली. या कार्यात यश मिळाले पण त्यामागे संघर्ष होता.
सचिन ईटकर म्हणाले, रचनात्मक कार्यातूनच देश घडत असतो. शिका आणि कमवा या योजनेतून विश्र्वेश कुलकर्णी यांचे कार्य खऱ्या अर्थाने रचनात्मक आणि देशाला प्रगतीपथावर नेणारे आहे. स्वयंस्फूर्तीनेच समाजात बदल घडत असतात. अशा लोकांनाच फार कष्ट सोसावे लागतात. सरकारे कोणतीही असली तरी सिस्टिम तिच असते. त्यांना प्रवाहाच्या बाहेर जाऊन काम करायचे नसते. भारताला तरुणांचा देश म्हटले जाते परंतु लाभार्थी योजना बंद झाल्या नाहीत तर तरुणाईला भवितव्य राहणार नाही. तरुणाईला घडविणारे कुलकर्णी खऱ्या अर्थाने रोल मॉडले आहेत.
स्वागतपर प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्काराविषयी माहिती देत आडकर फौंडेशन आणि रंगत-संगत प्रतिष्ठानचा हा सोळाशेवा कार्यक्रम असल्याचे सांगितले. कर्तृत्ववान व्यक्तींचे कार्य समाजासमोर आणून त्यातून समाजाला दिशा मिळावी असा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर योगेश रांगणेकर यांनी मानपत्राचे वाचन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!