शबनम न्यूज | प्रतिनिधी
किवळे, रावेत आणि मामुर्डी परिसरातील प्रलंबित नागरी समस्यांकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील सुमारे २५ गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांनी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. या आंदोलनात १ हजारांहून अधिक नागरिक सहभागी होण्याची शक्यता असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षांत किवळे, रावेत आणि मामुर्डी परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढली असली तरी त्याच्या तुलनेत रस्ते, वाहतूक व्यवस्था, अंडरपास आणि अन्य मूलभूत पायाभूत सुविधांचा अपेक्षित विकास झालेला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. परिणामी, हजारो रहिवाशांना दररोज वाहतूक कोंडी, खराब रस्ते, अंडरपासची दुरवस्था आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
१८ मीटर डीपी रोड तातडीने विकसित करण्याची मागणी
रावेत आणि किवळेच्या सीमेवरील १८ मीटर डीपी रोड अद्याप पूर्ण क्षमतेने विकसित झालेला नसल्याने परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण पडत आहे. हा रस्ता तातडीने विकसित करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सोसायट्यांसमोरील रस्त्यांची दुरवस्था
परिसरातील सुमारे १५ ते २० सोसायट्यांसमोरील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. खड्डे, खराब डांबरीकरण आणि अपुऱ्या रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुकाई चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर
मुकाई चौक परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक तसेच स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट होत असून, वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अंडरपासच्या दुरवस्थेवर नाराजी
समीर लॉन्स अंडरपासची दयनीय अवस्था सुधारण्याबरोबरच तेथे वारंवार होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मामुर्डी अंडरपासचीही तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे.
वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी
ITrend आणि परिसरातील तत्सम सोसायट्यांमध्ये वीजपुरवठ्याच्या समस्या वारंवार निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करून नियमित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ठोस कृती आराखडा जाहीर करण्याची मागणी
नागरिकांच्या या सर्व मागण्यांची महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी कालबद्ध आणि ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी केली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पायाभूत सुविधा विकसित न झाल्यास भविष्यात या परिसरातील वाहतूक व नागरी समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.





Total Users : 216373