शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका हद्दीतील बालेवाडी-म्हाळुंगे रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ११ वर्षीय विराज पाटोळे या निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अत्यंत गंभीर घटनेची दखल घेत आम आदमी पार्टी युवा आघाडी आक्रमक झाली असून, या प्रकरणास जबाबदार असणारे पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांच्यावर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी रविराज काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र ईमेलद्वारे पाठवून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पक्षाचे प्रमुख आरोप व मागण्या:
1) ऐन पावसाळ्यात अनेक बांधकाम व्यावसायिक आणि शासकीय यंत्रणांना नियम डावलून रस्ते खोदाईच्या परवानग्या दिल्या गेल्या, मात्र त्यानंतर रस्ते दुरुस्त करण्यात आले नाहीत.
2) पुणे महानगरपालिकेने खड्डे बुजवण्यासाठी 254 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केल्याचा दावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात शहरातील रस्त्यांवर अद्यापही मोठे व जीवघेणे खड्डे कायम आहेत.
3)प्रशासकीय दुर्लक्षामुळेच एका लहान बालकाला आपला जीव गमवावा लागला असून, हे महापालिकेचे ‘पाप’ असल्याचा आरोप आपतर्फे करण्यात आला आहे.
दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून यावर केलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे करण्यात आली आहे.
निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कठोर फौजदारी कारवाई होत नाही, तोपर्यंत आम आदमी पार्टीतर्फे तीव्र लढा दिला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.





Total Users : 214746