इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अभय भोर यांच्या हस्ते भोसरी एमआयडीसी येथे ध्वजारोहण
भोसरी, पुणे : दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त भोसरी एमआयडीसी येथे उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अभय भोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिलेबी वाटून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. अभय भोर म्हणाले, “भारताला जगात अग्रस्थानी नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या क्षेत्रातून योगदान देण्याचा संकल्प केला पाहिजे. हा देश कामगारांचा, उद्योगांचा आणि शेतकऱ्यांचा आहे. ‘सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्’ अशा आपल्या समृद्ध भारताला आधुनिकतेची जोड देऊन आणखी सामर्थ्यवान बनविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून तरुणांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत तसेच देशात नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि नावीन्य विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. देशात स्वच्छतेबरोबरच सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकता आणि बंधुभाव रुजविणे आजच्या काळाची गरज आहे. औद्योगिक क्रांतीला अधिक गती देत प्रत्येक तरुणाने कला-कौशल्य आत्मसात करून भारताला आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात जगात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही श्री. भोर यांनी सांगितले.
यावेळी दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु. दुर्गा भोर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले, “आपण आपल्या देशाला ‘भारत माता’ म्हणतो. त्यामुळे या देशातील प्रत्येक माता-भगिनीचा सन्मान आणि सुरक्षितता जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. भारतातील महिलांनी यापूर्वीही विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. देशातील महिला सक्षम असून आगामी काळात अधिकाधिक महिलांनी कौशल्य विकसित करून उद्योग, व्यवसाय, शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रात नेतृत्वासाठी पुढे यावे.”
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते श्री. शिवाजीराव पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संयोजन पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख जयश्री साळुंखे, शहर उपाध्यक्ष रईसा पठाण, उद्योग विभाग अध्यक्षा रेश्मा मुल्ला, शहर उपाध्यक्ष रमाताई बनसोडे, युवती अध्यक्षा अवंतिका भोर, शहर सचिव माही शेख, क्रीडा विभागाच्या दिपाली निकम, कामगार आघाडीचे निरंजन मनकर, अमोल चव्हाण, खदीर पठाण, रफिक शेख, क्रीडा विभागाचे अशोक बेलापूरकर, व्यापारी विभागाचे अध्यक्ष शांतीलाल डांगी आणि युवा अध्यक्ष आकाश बनसोडे यांनी केले.





Total Users : 213811