शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण विभागाशी संबंधित वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांची भेट घेऊन शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विषय त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. या भेटीची सकारात्मक दखल घेत संरक्षण मंत्री तसेच वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज खडकी हेडक्वार्टर्स येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस महापौर रवि लांडगे उपस्थित होते. त्यांनी कर्नल रवि कुमार गरगोत्रा यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
बैठकीत प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनची हद्द कमी करणे व शक्य त्या ठिकाणी निर्बंध हटविणे, शहरासाठी अत्यावश्यक असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी हॉटेल कलासागरजवळील संरक्षण विभागाची जागा उपलब्ध करून घेणे तसेच पिंपळे सौदागर परिसरात नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे, या शहराच्या भविष्यातील विकासाशी थेट संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
विशेषतः रेड झोनचा प्रश्न हा हजारो नागरिकांच्या मालमत्ता, बांधकामे आणि परिसराच्या विकासाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मॅगझिन चौक येथील अम्युनेशन डेपो स्थलांतरित करण्यात आलेला असल्याने त्या परिसरावरील ‘रेड झोन’ निर्बंध पूर्णतः हटविण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने हॉटेल कलासागरजवळील संरक्षण विभागाची जागा कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच पिंपळे सौदागर व लगतच्या परिसरातील आपत्कालीन सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नवीन अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या विषयावरही सकारात्मक चर्चा झाली.
केंद्र शासन, संरक्षण मंत्रालय, संरक्षण विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्यात प्रभावी समन्वय साधून हे प्रश्न निर्णायक टप्प्यापर्यंत नेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले विषय केवळ चर्चेपुरते मर्यादित न ठेवता त्यावर ठोस निर्णय होऊन नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळावा, यासाठी सर्व स्तरांवर समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे.
महापौर रवि लांडगे म्हणाले,
“पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनसह संरक्षण विभागाशी संबंधित अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या प्रश्नांचा थेट परिणाम हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच शहराच्या विकासावर होत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री मा. श्री. राजनाथ सिंह यांनी या विषयांची सकारात्मक दखल घेतल्यामुळे आज संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पुढील स्तरावर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः मॅगझिन चौक येथील अम्युनेशन डेपो स्थलांतरित झाल्याने त्या परिसरावरील रेड झोन निर्बंध पूर्णतः हटविण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही होईल, असा विश्वास आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि नवीन अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून घेण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. शहरहिताचे हे प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न ठेवता ठोस निर्णयापर्यंत नेऊन नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळवून देणे, हेच आमचे ध्येय आहे.”
बैठकीस नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे, सहाय्यक संचालक संदेश खडतरे, खडकी हेडक्वार्टर्सचे जनसंपर्क अधिकारी किरण पवार तसेच संरक्षण विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.





Total Users : 213518