पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्वतंत्र मुख्यालयासाठी तब्बल आठ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. ताथवडे येथील वळुमाता प्रक्षेत्रातील ५० एकर (२० हेक्टर) जमीन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रत्यक्ष ताब्यात देण्यात आली आहे. त्यामुळे भाड्याच्या इमारतीत सुरू असलेल्या पोलीस मुख्यालयाला आता स्वतःची हक्काची जागा मिळाली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना २८ मे २०१८ रोजीच्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार झाली असून, १५ ऑगस्ट २०१८ पासून प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले. मात्र, आठ वर्षांनंतरही पोलीस मुख्यालय, परेड ग्राऊंड व अन्य अनुषंगिक कार्यालयांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नव्हती. सध्या पोलीस मुख्यालय निगडी येथील महापालिकेच्या बोऱ्हाडे शाळेच्या भाडेतत्त्वावरील इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत आहे.
ही अडचण लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर मुख्यालयासाठी जागा मिळविण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला. वळुमाता प्रक्षेत्र, ताथवडे येथील उपलब्ध जमिनीपैकी २० हेक्टर जागा पोलीस मुख्यालयासाठी देण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही पाठपुरावा केला.
त्यानंतर मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेनंतर १ जुलै २०२६ रोजी महसूल व वन विभागाच्या शासन ज्ञापनाद्वारे ताथवडे येथील २० हेक्टर जमीन पोलीस मुख्यालय, परेड ग्राऊंड व अन्य अनुषंगिक कामांसाठी मंजूर करण्यात आली.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी, थेरगाव यांनी ताथवडे येथील सर्व्हे क्रमांक १६, १७, १८ व १९ मधील क्षेत्रातून २० हेक्टर (५० एकर) जमीन १३ ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रत्यक्ष ताब्यात दिली.
‘एकाच छताखाली’ पोलिसांच्या विविध सुविधा
या जागेवर पोलीस उपआयुक्त, मुख्यालय यांचे कार्यालय, भव्य परेड ग्राऊंड, पोलीस भरती मैदान, श्वान पथक, मोटार परिवहन विभाग, क्यूआरटी कार्यालय, पोलीस शस्त्रागार, रनिंग ट्रॅक व विविध क्रीडा सरावाची मैदाने उभारण्यात येणार आहेत.
याशिवाय पोलीस पाल्यांसाठी शाळा, पोलीस दवाखाना, बीडीडीएस इमारत, इंटरनल शूटिंग रेंज, बहुद्देशीय हॉल, वरिष्ठ पोलीस अधिकारी व अधिकारी-अंमलदारांसाठी निवासस्थाने तसेच बंदोबस्तासाठी येणाऱ्या अधिकारी-अंमलदारांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या जागेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय कामकाजाला मोठी गती मिळणार असून, पोलीस दलासाठी आवश्यक प्रशिक्षण, क्रीडा, निवास आणि अन्य सुविधा एकाच परिसरात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही कार्यवाही पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपआयुक्त, मुख्यालय गणेश इंगळे आणि पोलीस निरीक्षक विकास राऊत यांनी मंत्रालय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच ताथवडे येथील संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला.
आठ वर्षांची प्रतीक्षा संपवत पिंपरी-चिंचवड पोलिसांना अखेर स्वतःच्या मुख्यालयासाठी ५० एकर जागा मिळाल्याने पोलीस दलाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.





Total Users : 213480