शबनम न्यूज | प्रतिनिधी
भोसरी, दिघी आणि परिसरातील सुमारे पाच लाख नागरिकांना मेट्रो सेवेपासून वंचित ठेवून कोणताही आराखडा मंजूर होणार नाही. भोसरी गावातून मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नसून, नागरिकांच्या हक्काची मेट्रो सेवा मिळवून देण्यासाठी ‘नो कॉम्प्रमाईज’ची भूमिका घेण्यात आली आहे, असा स्पष्ट इशारा भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिला.
पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत भक्ती शक्ती- वाकड- नाशिक फाटा- चाकण मेट्रो मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) सादरीकरणावेळी भोसरीतील मेट्रो कनेक्टिव्हिटीचा मुद्दा आमदार लांडगे यांनी ठामपणे उपस्थित केला. यावेळी महापौर रवि लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह महामेट्रो आणि महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आमदार लांडगे यांनी भोसरी गावातून मेट्रो मार्गिकेच्या नियोजनाबाबत भूमिका स्पष्ट करताना, “भोसरी, दिघी आणि परिसरातील लाखो नागरिकांच्या सोयीचा विचार करून मेट्रो कनेक्टिव्हिटी सुनिश्चित झालीच पाहिजे. यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही,” असे स्पष्टपणे सांगितले. यावर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांनी, भोसरीतील प्रस्तावित मेट्रो मार्गिकेसाठी विद्यमान उड्डाणपूल पाडण्याची वेळ येऊ शकते, असे सांगितले. पण, भोसरी, दिघी आणि परिसरातील सुमारे पाच लाख नागरिकांना त्यांच्या हक्काची मेट्रो सेवा मिळालीच पाहिजे. नागरिकांच्या हितापेक्षा कोणतीही बाब मोठी नाही,” असे आमदार लांडगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक…
तसेच, मेट्रो कनेक्टिव्हिटीचा हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून, त्यांच्या उपस्थितीत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय बाबींचा सविस्तर आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही निश्चित करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, भोसरी एमआयडीसी, मोशी, चऱ्होली, दिघी आणि आळंदी रोड परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, भविष्यातील वाहतुकीच्या गरजांचा विचार करून मेट्रोचे जाळे सर्व भागांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भोसरीतील मेट्रो कनेक्टिव्हिटी हा केवळ एका भागाचा प्रश्न नसून, शहराच्या भविष्यातील विकासाशी निगडित विषय असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
“भोसरी, दिघी आणि परिसरातील सुमारे पाच लाख नागरिकांना हक्काची मेट्रो सेवा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही. या भागातील नागरिकांना मेट्रोपासून वंचित ठेवणार नाही. मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत लवकरच बैठक होईल आणि नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.


