spot_img
spot_img
spot_img

न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त ग्रंथदिंडी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त ग्रंथदिंडी व निर्मलवारीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. वारकरी परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, संत साहित्याचे महत्त्व समजावे आणि सामाजिक व पर्यावरणीय मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते ग्रंथपूजन व दिंडी पूजनाने झाली. यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत “ज्ञानबा-तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि हरिनामाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय करून टाकला.

विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठूनामाचा गजर केला, तर विद्यार्थ्यांनी गळ्यात टाळ अडकवून ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांचा गजर करत दिंडीत सहभाग घेतला. यावेळी “झाडे लावा, झाडे जगवा” अशा घोषणांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

दिंडी शाळेपासून शिवार चौक मार्गे पुन्हा शाळेत परतल्यानंतर विद्यार्थ्यांनी वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी का जातात, यावर आधारित नाट्यरूप सादरीकरण केले. तसेच वैष्णव धर्म, संत परंपरा, समाजप्रबोधन आणि सत्य, समता व मानवतेचा संदेश देणाऱ्या संतांच्या शिकवणीवर आधारित प्रसंग प्रभावीपणे सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले भारूड, अभंग आणि संतांच्या वेशभूषेतील सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमास डॉ. अभिजित कोकणे, डॉ. प्रियंका कोकणे, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!