प्रतिनिधी युनूस खतीब | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड, दि. २५ जुलै २०२६: उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चार महिन्यांच्या सातत्यपूर्ण तपासानंतर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत चार आरोपींना मुंबई व बेंगळुरू येथून अटक केली. आरोपींनी बिहारमधील मूळ गावी लपवून ठेवलेले सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने (किंमत ₹१२.६० लाख) जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मौजे महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील रहिवासी कविता मदन कड या यात्रेसाठी मूळ गावी गेल्या असताना ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील साहित्याची नासधूस करत कपाटातील सोन्याचे दागिने चोरी केले होते. याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०७/२०२६ दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. तपासादरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मुख्य आरोपी निक्कुकुमार सिंग चोरीचे सोने घेऊन बिहारला पळाल्याचे समोर आले.
मुख्य आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी बिहारनंतर कर्नाटकमध्ये लपून राहत होता. त्याचा भाऊ रंजन सिंग यानेही चोरीचे दागिने लपविण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे रंजन सिंग याला मुंबईतून आणि निक्कुकुमार सिंग याला बेंगळुरूहून ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी बिहारमधील सितामढी येथे जाऊन लपवून ठेवलेले १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.
अटक आरोपी
निक्कुकुमार देवकी सिंग (२२, सितामढी, बिहार)
रंजनकुमार देवकी सिंग (२०, सितामढी, बिहार)
राजकुमार ऊर्फ प्रिन्सकुमार विजय पासवान (१९, रोहतास, बिहार)
डिंपल पटेल विनोद सिंग (२६, कैमूर/भभुआ, बिहार)
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे करत आहेत.


