पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
बँकेपेक्षा 30 टक्के अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ₹9 लाख 70 हजारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज गोपाळ देसले (रा. काळेपडळ, हडपसर, पुणे; मूळ रा. नंदुरबार) याने ऑक्टोबर 2023 ते 2 सप्टेंबर 2024 या कालावधीत फिर्यादी दिलीप नारायण वडेलकर (वय 70, रा. वराळे, ता. मावळ) यांना जास्त परताव्याचे आश्वासन देत वेळोवेळी धनादेश, यूपीआय व रोख स्वरूपात एकूण ₹9.70 लाख स्वीकारले. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा किंवा मूळ रक्कम न देता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी 24 जुलै 2026 रोजी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोवारकर करीत आहेत.


