पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
सायबर फसवणुकीत वापरल्या गेलेल्या बँक खात्यामार्फत तीन नागरिकांकडून ₹1.70 लाखांची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत ललितकुमार रावल (रा. समृद्धी ऋतुगंध सोसायटी, पाटीलनगर, चिखली) याने एचडीएफसी बँकेत खाते उघडून साथीदारांच्या संगनमताने ते सायबर फसवणुकीसाठी वापरल्याचा आरोप आहे. या खात्यावर एकूण ₹1.70 लाखांचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, देशातील तीन नागरिकांच्या तक्रारींशी हे व्यवहार संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोटे करीत आहेत.


