spot_img
spot_img
spot_img

“तरुणाईमधील वाढत्या व्यसनाधीनतेचे मूळ मानसिक ताणतणावात” – डॉ. गिरिजा महाले

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मनो-सामाजिक समुपदेशन केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ औंध यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानसिक आरोग्य आणि ताणतणाव’ या विषयावर व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मा. डॉ. गिरिजा महाले, प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ, प्रमुख, मानसिक आरोग्य विभाग, सिंबायोसिस (लवळे), पुणे या उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य,डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी भूषविले. यावेळी मा. डॉ. सुमेधा भोसले, मा. रोटेरियन सचिन मोरलवार, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ औंध; मा. विनीता सहदोत, मा. सुषमा पांडे, मा. कौस्तुभ भांडारकर, मा. अमित कुलकर्णी, मा. वृंदा वाळिंबे,मा. फोरा दिवाणजी उपस्थित होते.

डॉ. गिरिजा महाले मार्गदर्शन करताना म्हणाल्या, “आजच्या गतिमान आणि स्पर्धेच्या युगात मानसिक आरोग्य जपणे हे प्रत्येक तरुणासमोरील सर्वात मोठे आव्हान बनले आहे. नैराश्य, भीती, असुरक्षितता आणि नात्यांमधील ताण यांमुळे विद्यार्थी नकळत व्यसनाधीनतेकडे ओढले जात आहेत. व्यसन हा केवळ सवयीचा भाग नसून, तो एक गंभीर मानसिक आजार आहे; ज्याचे मूळ वाढत्या मानसिक ताणतणावात आहे.

आपल्या समाजात भावनांबद्दल किती लोक उघडपणे बोलतात? असा प्रश्न उपस्थित करत डॉ. महाले म्हणाल्या, “राग, भीती, आनंद, दुःख या सर्व नैसर्गिक भावना आहेत. पण या भावनांचे योग्य नियोजन कसे करायचे, हे आपल्याला कोणी शिकवत नाही. मनातल्या भावना व्यक्त न करता आल्यामुळे किंवा योग्य वेळी ‘नाही’ म्हणण्याची क्षमता नसल्यामुळे तरुण तात्पुरता दिलासा मिळवण्यासाठी व्यसनाकडे वळतात. मन:स्थिती बिघडली की व्यसन जडते. एकदा का मेंदूत व्यसनाचे बीज पेरले गेले की, तो आजार बरा करणे कठीण जाते. व्यसनामुळे चिडचिडेपणा, चिंता आणि नैराश्य यांसारखे शारीरिक व मानसिक आजार उद्भवतात. म्हणूनच, व्यसनाचा आजार होण्यापूर्वीच इतरांना आणि स्वतःला यापासून वाचवणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.
रोटेरियन सचिन मोरलवार यांनी आपल्या भाषणात तरुणांच्या मानसिक आरोग्यासाठी रोटरी क्लब नेहमीच अशा विधायक उपक्रमांना पाठिंबा देईल, अशी ग्वाही दिली. तसेच, या विषयाचे गांभीर्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी महाविद्यालयात ‘निबंध व रेखाचित्र स्पर्धा’ आयोजित करण्याची घोषणा त्यांनी केली. विद्यार्थ्यांना पुढील १५ दिवसांत एका पानाचा निबंध व रेखाचित्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, पुढील महिन्यात या स्पर्धेचा निकाल घोषित करून विजेत्यांना बक्षिसे दिली जातील असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेश्मा दिवेकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ. देवकी राठोड यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ वैशाली सुपेकर यांनी केले. या कार्यक्रमाल महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि ६८ विद्यार्थी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!