पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
देहूगाव परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११९/१७७ व १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता देहूरोड ते देहूगाव मार्गावरील परंडवाल चौक, देहूगाव येथे ही दुर्घटना घडली. फिर्यादी मनोहर शाम विधाटे (वय ४८, रा. अभंगनगरी रोड, देहूगाव) यांचा मुलगा ओम मनोहर विधाटे (वय २०) आणि त्याचा मित्र प्रेम महेश शेवाळे (वय २०) हे अॅक्टिव्हा दुचाकी (एमएच-१४ केएल-२६६६) वरून प्रवास करत होते.
परंडवाल चौक येथे ते थांबले असताना त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या अशोक लेलँड ट्रक (एमएच-१२ एलटी-७०७२) ने जोरदार धडक दिली. ट्रक चालकाने भरधाव वेगाने, निष्काळजीपणे व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचा आरोप आहे.
या अपघातात प्रेम महेश शेवाळे याचा मृत्यू झाला, तर ओम मनोहर विधाटे गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी ट्रक चालक बाळू विश्वनाथ बखळे (वय ३०, रा. करंज खेडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) याला अटक करण्यात आली असून देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे देहूगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून भरधाव वाहनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


