spot_img
spot_img
spot_img
spot_img

सिंहगडावर ‘मुस्लिमांना प्रवेशबंदी’ फलक; पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या सिंहगड किल्ल्यावर “हा गड हिंदूंचा आहे, मुसलमानांना गडावर प्रवेश बंदी आहे” असा आक्षेपार्ह मजकूर असलेला फलक लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन, पुणे यांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संस्थेचे संचालक अन्वर हुसेन बुधन शेख यांनी या प्रकाराचा निषेध करत म्हटले की, सिंहगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित असलेला राष्ट्रीय वारसा आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला धर्माच्या आधारावर नागरिकांना प्रवेशबंदी जाहीर करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारचे फलक केवळ बेकायदेशीर नसून समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि संविधानिक मूल्यांना आव्हान देणारे आहेत.

या संदर्भात पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी, हवेली पोलीस ठाणे आणि पुणे ग्रामीण पोलीस कंट्रोल रूम यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे. संबंधित फलक कोणी, कोणत्या उद्देशाने आणि कोणाच्या परवानगीने लावला याची चौकशी करून दोषींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अन्वर शेख यांनी इशारा देताना म्हटले की, आज सिंहगडावर एका धर्माच्या नावाने प्रवेशबंदीचा फलक लावला जात असेल आणि त्यावर कारवाई झाली नाही तर उद्या देशातील इतर सार्वजनिक व ऐतिहासिक स्थळांवरही अशाच प्रकारच्या घटना घडू शकतात. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे.

संस्थेने प्रशासनाकडे फलक तात्काळ हटविणे, दोषींवर गुन्हा दाखल करणे, पर्यटकांच्या सुरक्षिततेची हमी देणे आणि भविष्यात अशा प्रकारचे भडकाऊ फलक लावण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे सिंहगड परिसरातील वातावरण संवेदनशील बनले असून प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!