spot_img
spot_img
spot_img

अतिवृष्टीने मावळ होरपळला; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आमदार सुनील शेळके

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. विशेषतः आंदर मावळ भागात अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी नुकसानग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची सविस्तर पाहणी केली आणि प्रशासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
सततच्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी शेती वाहून गेली, भातशेतीचे मोठे नुकसान झाले, तर काही भागांत दरडी कोसळून रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यात यंदाचा पाऊस शेतकऱ्यांसाठी मोठे संकट ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने केलेली लागवड आणि मशागतीचे काम पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे.
आमदार सुनील शेळके यांनी आंदर मावळातील विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. प्रत्येक ठिकाणी नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करत अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विलंब न करता पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.
यापूर्वीही पाटण परिसरात दरड कोसळून जीवितहानी झालेल्या ठिकाणी तसेच लोणावळ्यातील पूरग्रस्त भागात जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली होती. पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत मिळावी, पुनर्वसनाची प्रक्रिया गतीमान व्हावी आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. आता आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी संपूर्ण तालुक्यातील आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला.
यावेळी सुरू असलेल्या कान्हे–वडेश्वर–सावळा रस्त्याच्या कामाचीही आमदार शेळके यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हे काम दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण व्हावे, याबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना त्यांनी कडक शब्दांत सूचना दिल्या. पावसामुळे नागरिकांना कोणताही अतिरिक्त त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पाहणीदरम्यान मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या अडचणी आमदारांसमोर मांडताना शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिली. त्यावर प्रत्येक नुकसानग्रस्ताला न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
अतिवृष्टीच्या संकटात प्रत्यक्ष शेतात, गावात आणि नागरिकांमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी करणाऱ्या आमदारांच्या या दौऱ्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!