पुणे – गीताने नुकतेच शनिवार दि.२७ जून २०२६ रोजी ‘इंग्लिश चॅनेल’ चे ५४ किलोमीटरचे आव्हानात्मक अंतर १४ तास ३१ मिनिटांत पोहून पूर्ण केले.( इंग्लिश चॅनेलचे अंतर ३५ किलोमीटर आहे.काल समुद्रातील लाटांमुळे गीता प्रत्यक्ष पोहताना हे अंतर ५४ किलोमीटर झाले.) गीता तुझे मन:पूर्वक अभिनंदन. इंग्लिश चॅनेल स्विमिंग असोशिएशन या संस्थेच्या निगराणीत ही मोहीम पार पडली. गीता अंतरराष्ट्रीय कोच शेखर खासनीस आणि प्रतिक जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
गीता दिपा महेश मालुसरेच्या जिद्द आणि अदम्य इच्छाशक्तीची ‘विजयी गाथा’… मुळशीची सुवर्णकन्या गीता ही भारताची जलपरी म्हणून प्रसिद्ध आहे. गीताने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश जगभरात कौतुकास पात्र आहे. गीताचा हा यशस्वी प्रवास मात्र प्रचंड संघर्षमय आहे. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून पोहायला सुरुवात करत बघता बघता या प्रतिभावान जलतरणपटूने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. गीताचा हा संघर्षमय यशस्वी प्रवास युवा पिढीला कायम प्रेरणा देणारा राहील. २०१७ मध्ये, आपल्या १३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिने मुंबईच्या समुद्रात ३२ किलोमीटरचे अंतर अवघ्या ६ तास २६ मिनिटांत पोहून पार करण्याचा मोठा विक्रम केला होता. भारतातील सर्वच आव्हानात्मक स्पर्धांमध्ये गीता नेहमीच अव्वल राहिली आहे. फर्ग्युसन कॅालेजमधे गीताने पदवीचे शिक्षण घेताना मुख्य स्वप्नांचा पाठलाग करणं कधीही थांबवलेलं नाही.
गीताच्या संकटांची मालिका आणि संघर्ष:
कोरोनाचा ब्रेक: २०२०-२१ मधील कोरोनाच्या संकटामुळे गीताच्या सरावाला मोठा ब्रेक लागला. कोरोणामुळे दोन वर्षे प्रॅक्टिस बंद असूनही तिने पुन्हा जिद्दीने सुरुवात केली.
जेलीफिशचा जीवघेणा दंश: कोरोणाच्या संकटानंतर लगेच नोव्हेंबर २०२२ मध्ये रत्नागिरी येथील सागरी स्पर्धेत पोहत असताना गीताला ‘जेलीफिश’ या विषारी जलचराचा तीव्र दंश झाला. तिचा हात निकामी होण्याचा धोका निर्माण झाला होता. तिच्या हातावर एका वर्षात तब्बल ११ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या.त्यामुळे गीताचे स्विमिंग करिअर संपले असे वाटत होते.
गीताने हार मानली नाही!
या जखमांवर मात करत आज इतिहास रचला!
गेले वर्षभर दररोज आठ तास तर कधी दहा तास तीने सराव केला. हातावरच्या खोल जखमा सुकलेल्या नसताना, हातातून रक्त येत असतानाही ती कधी थांबली नाही. काल इंग्लिश चॅनेल पोहत असतानाही तिला या जुन्या जखमांचा प्रचंड त्रास होत होता. मात्र, असह्य वेदनांकडे दुर्लक्ष करत तिने आपले लक्ष फक्त स्वप्नावर केंद्रित केले आणि अखेर इतिहास रचला! जागतिक जलतरण क्षेत्रातील अत्यंत अवघड मानली जाणारी ‘इंग्लिश खाडी’ गीताने यशस्वीरीत्या पार केली आहे. आठ दिवसांपुर्वी इंग्लडमध्ये प्रॅक्टीस करताना जेली फीशने पुन्हा एकदा गीताला दंश केला. सुदैवाने हा दंश विशारी नव्हता. इंग्लिश खाडी पोहताना जेली फीशचे प्रचंड दडपण मात्र होते. इतका संघर्ष करून मिळवलेले हे यश जगाच्या पाठीवर खरोखरच एकमेवाद्वितीय आहे.
गीताचे ध्येय: ‘क्वीन ऑफ ओशन’
‘क्वीन ऑफ ओशन’ (Queen of Ocean) हा बहुमान मिळवण्यासाठी गीताला जगातील सात प्रमुख खाड्या पोहायच्या आहेत. इंग्लिश खाडी पार करून तिने या मोहिमेची यशस्वी सुरुवात केली आहे. गीता या वर्षी सप्टेबरमध्ये कॅलीफोर्नियातील ३२ किलोमीटरची कॅटेलीना चॅनेल आणि 1 आॅक्टोबर रोजी न्यूयार्कमधील ४६ किलोमीटरची ट्वेंटी ब्रीजेस स्पर्धा पोहणार आहे.
गीताचे वडील महेश मालुसरे म्हणाले की, ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी वेदनांना विसरुन. आपल्या ध्येयाचा पाठलाग करणार्या गीताचा मला वडील म्हणून अभिमान वाटतो. हात गमावण्याची वेळ ज्या स्विमिंगमुळे आली होती त्याच स्विमिंग क्षेत्रात अव्हानात्मक अशी सेव्हन ओशन चॅलेंज पुर्ण करायचे हे ध्येय ठेवून ती ज्या प्रकारे सराव करत आहे त्याला सलाम आहे. कित्येक वेळा हातमधून रक्त यायचे वेदना व्हायच्या पण तीने सराव सोडला नाही. जिद्द, सातत्य, चिकाटी आणि आत्मविश्वास यामुळेच ती हे करु शकते.


