शबनम न्यूज | प्रतिनिधी
मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील दुर्घटना ही नैसर्गिक नसून पूर्णपणे मानवनिर्मित असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणात महापालिका आयुक्त, प्रकल्प अधिकारी आणि संबंधित जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
दुर्घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अंधारे म्हणाल्या की, “निष्पाप कामगारांचा जीव गेला असून केवळ आर्थिक मदत जाहीर करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे.”
त्या पुढे म्हणाल्या, “राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली पाच लाख रुपयांची मदत ही जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. शिवसेना या प्रकरणात न्यायालयीन लढाई लढणार असून मृत आणि बाधित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे.”
मोशी दुर्घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून जबाबदारांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.


