spot_img
spot_img
spot_img

मोशी दुर्घटनेप्रकरणी चार कंपन्या आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

नगरसेविका संगीता (नानी) ताम्हाणे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर आता राजकीय वातावरण अधिक तापले आहे. नगरसेविका संगीता (नानी) प्रभाकर ताम्हाणे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांना निवेदन देत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि संबंधित कंपन्या तसेच अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ताम्हाणे यांनी आपल्या निवेदनात आरोप केला आहे की सिन्फरा कंपनीने या प्रकल्पाची उभारणी केली असून, अँटोनी  लारा कंपनीने तो अवैधपणे चालवला. तसेच बीव्हीजी आणि सेव्ह ईनव्हायरो या कंपन्या सब-कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून काम करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
निवेदनात असा गंभीर आरोप करण्यात आला आहे की, कचऱ्याच्या डोंगराच्या बाजूला ५० कोटी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारत उभारण्यात आली. ही इमारत सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठिकाणी उभारण्यात आल्यामुळेच दुर्घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, क्षमतेपेक्षा कमी वीज निर्मिती दाखवून महापालिकेला आर्थिक तोटा झाल्याचे ताम्हाणे यांनी म्हटले आहे. महापालिकेला जवळपास सात कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
ताम्हाणे यांनी पुढील कंपन्या आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे : सिन्फरा कंपनी,अँटोनी  लारा कंपनी,बीव्हीजी कंपनी,सेव्ह ईनव्हायरो कंपनी,पर्यावरण व आरोग्य विभागातील संबंधित महापालिका अधिकारी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ कोटी रुपये आणि जखमी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळून ही दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे कचऱ्याचे स्खलन झाल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात असले, तरी सुरक्षितता नियमांचे पालन झाले होते का? हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित केला जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!