spot_img
spot_img
spot_img
spot_img

कॅन्टोन्मेंट विद्युत दाहिनीतील गैरव्यवस्थेविरोधात नगरसेविका रेश्मा कातळे आक्रमक; कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कॅन्टोन्मेंट येथील विद्युत दाहिनीमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवस्थेमुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत नगरसेविका रेश्मा बापुजी कातळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत दाहिनी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सविस्तर निवेदन सादर करून तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

प्रभागातील नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत सादर करण्यात आलेल्या निवेदनात, विद्युत दाहिनीमध्ये आवश्यक कर्मचारी उपलब्ध नसणे, परिसराची नियमित स्वच्छता होत नसणे तसेच अनेकदा विद्युत दाहिनी बंद असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दुःखाच्या प्रसंगीही नागरिकांना प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका बसत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

नगरसेविका रेश्मा कातळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे विद्युत दाहिनीची तातडीने पाहणी करून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, परिसरात नियमित स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था करणे आणि विद्युत दाहिनी अखंडितपणे सुरू राहण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना त्वरित राबविण्याची मागणी केली आहे.

याशिवाय, विद्युत दाहिनीच्या देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या संबंधित ठेकेदाराकडून करारातील सर्व अटींचे काटेकोर पालन करून घेण्यात यावे. सेवेत निष्काळजीपणा अथवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

“अंत्यसंस्कार ही अत्यंत संवेदनशील आणि भावनिक बाब आहे. अशा वेळी नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी हेलपाटे मारावे लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने आवश्यक सुधारणा कराव्यात. नागरिकांना सन्मानपूर्वक, सुरळीत आणि विनाअडथळा सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे मत नगरसेविका रेश्मा बापुजी कातळे यांनी व्यक्त केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!