spot_img
spot_img
spot_img
spot_img

पेपरफुटी प्रकरणांवर काँग्रेसचा भाजप सरकारवर हल्लाबोल; शिक्षणमंत्रींच्या राजीनाम्याची मागणी

NEET, TETसह विविध परीक्षांच्या पेपरफुटीची न्यायालयीन चौकशी करा; दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी

पिंपरी | प्रतिनिधी – युनूस खतीब

देश आणि राज्यातील विविध स्पर्धा व शैक्षणिक परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून केंद्र व राज्य सरकार युवकांच्या भविष्याशी खेळत असल्याचा आरोप करत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवारी पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली. NEET, TET, पॅरामेडिकल तसेच विविध भरती परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना हनुमंत पवार म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने विद्यार्थी व युवकांच्या भविष्याशी खेळण्याचा क्रूर प्रकार तात्काळ थांबवावा. देशभरात NEET परीक्षेची पेपरफुटी, महाराष्ट्रातील TET परीक्षा, राजस्थानमधील पॅरामेडिकल परीक्षा तसेच विविध भरती प्रक्रियांमधील पेपरफुटीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळले जात असून जबाबदार व्यक्तींवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

पवार म्हणाले, “पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये सरकार आणि प्रशासनातील काही अधिकारी थेट गुंतलेले असल्याची गंभीर शंका निर्माण झाली आहे. तरीही सरकार त्यांना संरक्षण देत आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, NSUI आणि युवक काँग्रेस देशभर आंदोलन करत आहेत.”

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावेत, अशी मागणी करत पवार यांनी NEET आणि TET पेपरफुटी प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. तसेच दोषींना तात्काळ गजाआड करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले की, पेपरफुटी रोखण्यासाठी सक्षम कायद्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, कायदा अस्तित्वात आल्यानंतरही TET परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे कायदा कुचकामी आहे की प्रशासनातील भ्रष्टाचाराला सरकारचे पाठबळ आहे, याचे उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे. २०२१ मधील TET पेपरफुटी प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवरील कारवाईचे पुढे काय झाले, याबाबतही सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले की, “पेपर फुटतो, विश्वास तुटतो” असा विश्वासघात विद्यार्थी आणि पालकांशी सातत्याने होत आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा व्यापार सुरू असून प्रश्नपत्रिकाही विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि भवितव्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

अनेक विद्यार्थ्यांनी पेपरफुटी आणि शैक्षणिक अनिश्चिततेमुळे टोकाची पावले उचलल्याचा उल्लेख करत बनसोडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत तात्काळ जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांच्या वाया गेलेल्या शैक्षणिक वर्षाची भरपाई कशी करणार, याचे उत्तर सरकारने द्यावे, असेही ते म्हणाले.

पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप असून या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

पत्रकार परिषदेस काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!