शबनम न्यूज | प्रतिनिधी
मोशी प्राधिकरण परिसरातील वाढत्या चोरी, घरफोडी व दरोड्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज दि. २४/०६/२०२६ रोजी आपल्या प्रभागातील कर्तव्यदक्ष नगरसेवक मा. श्री. तुषार भाऊ सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उपायुक्त श्री. जगताप साहेब, परिमंडळ – ३, पिंपरी चिंचवड, पुणे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
मागील काही दिवसांत साहिल रेसिडेन्सी, अमृतवेल, साई पार्क, रिद्धी सिद्धी संस्कृती आणि त्रिमूर्ती संकुल येथे घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत नागरिकांच्या भावना आणि चिंता प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम तुषार भाऊ सहाणे यांनी पुढाकार घेऊन केले.
यावेळी श्री. रविराज आळणे, श्री. प्रकाश सहाणे, श्री. संतोष गुंजाळ, श्री. किरण रोडे, श्री. सचिन रणपिसे, श्री. बाळासाहेब मोरे, सौ. सुजाता मासळकर, सौ. अनुराधा गुंजाळ आणि सौ. अरुणा सोनटक्के उपस्थित होते.
नागरिकांच्या समस्या आणि परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत मा. पोलीस उपायुक्त श्री. जगताप साहेब यांनी तात्काळ सहकार्य करत संबंधित यंत्रणा सक्रिय करण्याचे आदेश दिले. तसेच पीएसआय मा. श्री. बालाजी जोन्नापल्ले यांना तातडीने तपासास गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलिस प्रशासनाने या प्रकरणात जलद आणि प्रभावी कारवाई करण्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना मा. तुषार भाऊ सहाणे यांनी सांगितले की, “नागरिकांची सुरक्षा ही सर्वप्रथम जबाबदारी आहे. मोशी प्राधिकरण आणि संतनगर परिसर झपाट्याने विकसित होत असताना गुन्हेगारी घटनांनाही आळा बसणे आवश्यक आहे. एखाद्या नागरिकाच्या घरात चोरी होणे ही केवळ आर्थिक हानी नसून त्यांच्या मनातील सुरक्षिततेची भावना देखील डळमळीत करणारी बाब आहे.”
ते पुढे म्हणाले, “नागरिकांनी पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. प्रत्येक सोसायटीने स्वतःची सुरक्षा व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असणे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे.”
“गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधी, पोलिस प्रशासन आणि नागरिक यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून कोणतीही घटना घडल्यास प्रशासनासोबत खंबीरपणे उभे राहू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“सर्व सोसायटी पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक”
यानंतर सायंकाळी मा. तुषार भाऊ सहाणे यांच्या जनसंपर्क कार्यालय, सेक्टर ६ येथे परिसरातील विविध सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत वाढत्या चोरी, घरफोडी, वाहन चोरी आणि दरोड्यांच्या घटनांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक सोसायटीने कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या संवाद बैठकीस पीएसआय बालाजी जोन्नापल्ले साहेब आणि मा. श्री. संतोष फावडे साहेब उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना सुरक्षा विषयक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
पोलिस प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण सूचना
पीएसआय बालाजी जोन्नापल्ले साहेब यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, “गुन्हेगारांपेक्षा नागरिकांची जागरूकता अधिक प्रभावी ठरते. प्रत्येक सोसायटीने सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.”
त्यांनी पुढील सूचना दिल्या –
* सोसायटीमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सतत कार्यरत ठेवावेत.
* प्रवेशद्वारांवर येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवावी.
* नवीन भाडेकरू, घरकाम करणारे कर्मचारी, चालक आणि इतर व्यक्तींची पोलीस पडताळणी करावी.
* रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
* रिकामे किंवा बंद फ्लॅटची माहिती सार्वजनिकपणे कोणालाही देऊ नये.
* सोसायटीमध्ये पुरेशा प्रकाशव्यवस्थेची व्यवस्था करावी.
* सुरक्षा रक्षकांना नियमित सूचना व प्रशिक्षण द्यावे.
* सोसायटीतील नागरिकांनी परस्पर समन्वय ठेवून सुरक्षा समित्या स्थापन कराव्यात.
मा. श्री. संतोष फावडे साहेब यांनी देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी तात्काळ दूर करण्याचा सल्ला दिला.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी संयुक्त प्रयत्नांची गरज
बैठकीचा समारोप करताना उपस्थित सर्वांनी परिसरातील गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिक, सोसायटी व्यवस्थापन, लोकप्रतिनिधी आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच सुरक्षित आणि गुन्हेमुक्त परिसर निर्माण होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मोशी प्राधिकरण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने तत्परतेने घेतलेली दखल आणि मा. तुषार भाऊ सहाणे यांनी केलेला पाठपुरावा यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.


