पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि विविध प्रशिक्षणांसाठी कोचिंग क्लासेसची संख्या झपाट्याने वाढत असताना अनेक ठिकाणी अग्निसुरक्षा नियमांकडे होत असलेले दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते. देशातील सूरत, लखनौ आणि पिंपरी-चिंचवडमधील आगीच्या घटनांनी हा धोका पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
गुजरातमधील सूरत येथील तक्षशिला आर्केड कोचिंग क्लासमध्ये 24 मे 2019 रोजी लागलेल्या भीषण आगीत 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. अपुऱ्या सुरक्षा व्यवस्था आणि बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता.
त्यानंतर 1 डिसेंबर 2025 रोजी पिंपळे सौदागर येथील कोचिंग क्लासमध्ये आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत 42 विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका केली. मात्र ही घटना भविष्यातील संभाव्य मोठ्या दुर्घटनेचा इशारा मानली जात आहे.
दरम्यान, 22 जून 2026 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे कोचिंग/प्रशिक्षण संस्थेशी संबंधित इमारतीत लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेने गर्दीच्या शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
तज्ज्ञांच्या मते, अनेक कोचिंग क्लासेस अरुंद जागांमध्ये, अपुऱ्या जिन्यांसह किंवा आपत्कालीन निर्गमन मार्गांशिवाय चालविले जात आहेत. काही ठिकाणी अग्निशमन यंत्रणा केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात ती कार्यरत नसल्याचेही दिसून येते.
यामुळे प्रशासनाने सर्व कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण केंद्रे आणि खाजगी शैक्षणिक संस्थांची विशेष मोहीम राबवून सुरक्षा तपासणी करावी, फायर सेफ्टी प्रमाणपत्रांची पडताळणी करावी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“आग लागल्यानंतर मदत पोहोचविण्यापेक्षा आग लागू नये यासाठीची पूर्वतयारी अधिक महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड परवडणारी नाही,” असा इशाराही अग्निसुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे.


