शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराचा भविष्यातील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पवना धरण ते निगडी बंद जलवाहिनी प्रकल्पाला गती देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीला महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपसंचालक किशोर गोखले, मुख्य अभियंता प्रमोद ओव्हाळ, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, उषा विश्वासराव, हर्षद घुले यांच्यासह संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जलवाहिनीच्या मार्गातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून उर्वरित भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. विविध विभागांनी परस्पर समन्वय ठेवून प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे, असे स्पष्ट करण्यात आले. पाणी हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यंत संवेदनशील विषय असल्याने कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय विलंब सहन केला जाणार नसल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
पवना धरणातून निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, वर्ष २०५५ पर्यंतच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून ७५० दशलक्ष लिटर प्रतिदिन (MLD) क्षमतेचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाला आयआयटी मुंबईकडून तांत्रिक मान्यता मिळाली असून त्याची एकूण अंदाजित किंमत सुमारे ८९४.६७ कोटी रुपये आहे.
या प्रकल्पांतर्गत धरण परिसरात आधुनिक हेडवर्क्स, जॅकवेल, उच्च क्षमतेचे पंप, दुहेरी गुरुत्वाकर्षण जलवाहिनी, रेल्वे मार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाखाली टनेल बोरिंग तंत्रज्ञानाचा वापर तसेच संपूर्ण यंत्रणेवर देखरेख ठेवण्यासाठी अत्याधुनिक SCADA प्रणाली उभारण्यात येणार आहे.
प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ३४.८५ किलोमीटर मार्गापैकी ३१.४२ किलोमीटरचे भूसंपादन पूर्ण झाले असून केवळ ३.४३ किलोमीटर क्षेत्रातील संपादन प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित जमीन तातडीने संपादित करून प्रत्यक्ष कामाला अधिक वेग देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


