spot_img
spot_img
spot_img

प्रभाग १६ मध्ये धोकादायक ठिकाणी गतिरोधकांची मागणी; नगरसेविका रेश्मा कातळे यांचे प्रशासनाला निर्देश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत भागातील रस्ते अपघातप्रवण ठरत असून, तेथे तात्काळ सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात रविंद्र लातुरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका रेश्मा ताई कातळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

नगरसेविका कातळे यांनी सांगितले की, नागरिकांची सुरक्षितता ही प्रशासनाची प्राधान्याची बाब असली पाहिजे. धोकादायक ठिकाणांची पाहणी करून तेथे गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविणे, वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावणे, तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविणे गरजेचे आहे.
प्रभागातील काही भागांमध्ये वेगाने वाहने चालवली जात असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांनीही निदर्शनास आणून दिले आहे. विशेषतः सोसायटी समोरील रस्ता, शाळा परिसर, रावेत आणि किवळे मधील भाग आणि चौकांमध्ये सुरक्षा उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

याबाबत नगरसेविका कातळे यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!