spot_img
spot_img
spot_img

रावेतमध्ये पिस्टल व जिवंत काडतुसांसह दोघे जेरबंद; गुंडा विरोधी पथकाची धडक कारवाई

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

रावेत परिसरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. तर त्यांचा एक साथीदार फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गिनी विवांता सोसायटीसमोर, किवळे रोड, पंचशील चौक, रावेत येथे संशयित हालचाली करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत आशिष दत्तात्रय भालेराव (वय २८, रा. साईनगर, देहूरोड) आणि शुभम उर्फ किट्टु दीपक गायकवाड (वय २३, रा. आंबेडकर नगर, किवळे गावठाण) यांना अटक करण्यात आली आहे. तर सनी सिंग (रा. उत्तर प्रदेश, संपूर्ण पत्ता अज्ञात) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून १५ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आलेले असताना आरोपींकडे हे बेकायदेशीर शस्त्र आढळून आले.

या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!