spot_img
spot_img
spot_img

आमदार–महापौर चषक टी-२० स्पर्धेत तापकीर सर्व्हिस स्टेशनचा दणदणीत विजय

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड परिसरातील क्रिकेट प्रेमींसाठी आयोजित करण्यात आलेल्या आमदार–महापौर चषक टी-२० २०२६ स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला असून, उद्घाटनाच्या सामन्यात तापकीर सर्व्हिस स्टेशन संघाने प्रभावी कामगिरी करत विजय नोंदविला.

बजाज वाळके क्रिकेट मैदान येथे १६ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत सुरू असलेल्या या स्पर्धेत एकूण १६ संघांचा सहभाग आहे. स्पर्धेचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, कृष्णा पोरगे, पत्रकार विजय जगदाळे, अनिल दुराफे, शिवाजी शेळके, नागेश पडवळ तसेच आयोजक दत्ता गव्हाणे उपस्थित होते.

उद्घाटनाचा सामना पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघ आणि तापकीर सर्व्हिस स्टेशन संघ यांच्यात झाला. नाणेफेक जिंकून महानगरपालिका संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.

प्रथम फलंदाजी करताना तापकीर सर्व्हिस स्टेशन संघाने २० षटकांत ४ गडी बाद २०६ धावांची भक्कम मजल मारली. सुशांत कांबळे (नाबाद ८५) आणि सुमीत तापकीर (नाबाद ५८) यांनी दमदार खेळी साकारली, तर रणजित मगर यांनी ३७ धावांचे योगदान दिले. महानगरपालिका संघाकडून अमर मद्रासी यांनी २ बळी घेतले.

२७ धावांच्या सरासरीची गरज असताना प्रत्युत्तरात महानगरपालिका संघाने २० षटकांत ८ बाद १७० धावा केल्या. निखिल आव्हाड यांनी ६ षटकार आणि ३ चौकारांसह नाबाद ७५ धावांची झुंजार खेळी केली. त्यांना राहुल चावरिया (४०), ओंकार पवार (२०) आणि रवी माचरे (२३) यांनी साथ दिली.

तापकीर सर्व्हिस स्टेशन संघाने ३५ धावांनी विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. उत्कृष्ट फलंदाजीबद्दल सुशांत कांबळे यांना सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!