नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांची पीएमपीएमएल प्रशासनाकडे आग्रही मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरातील रहाटणी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव परिसरातून वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत थेट व नियमित पीएमपीएमएल बससेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे. या परिसरातील वाढती लोकसंख्या आणि हिंजवडी आयटी पार्कमध्ये कामासाठी जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांची प्रवासाची गरज लक्षात घेता ही बससेवा सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रहाटणी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव परिसराचा झपाट्याने विकास होत असून, या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली आहे. येथील अनेक नागरिक, विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी दररोज हिंजवडी आयटी पार्क येथे ये-जा करतात. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.
सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या परिसरातून वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी थेट आणि नियमित सार्वजनिक बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी वाहने व दुचाकींचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी वाढत असून, प्रवाशांचा वेळ आणि आर्थिक खर्चही वाढत आहे.
विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी नियमित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणे गरजेचे आहे. रहाटणी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव येथून वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत थेट बससेवा सुरू झाल्यास नागरिकांना मेट्रोचा वापर करणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच खासगी वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावरही नियंत्रण मिळविण्यास मदत होईल.
या मागणीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने मार्गाची पाहणी करून प्रवासी संख्येचे सर्वेक्षण करावे. तसेच कार्यालयीन वेळेत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुरेशा वारंवारतेने बसफेऱ्यांचे नियोजन करावे आणि ही सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे.
ही मागणी केवळ बसमार्ग सुरू करण्यापुरती मर्यादित नसून, वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




Total Users : 241181