शबनम न्यूज | प्रतिनिधी
महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांच्या नियुक्तीवरून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तब्बल नऊ महिन्यांपासून रखडलेल्या नियुक्त्यांचा विषय आता २० तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपच्या वाट्याला आलेल्या सात जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागणार, यावरून पक्षांतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपने ८४ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांपैकी सात जागा भाजपला, तर तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार आहेत. राष्ट्रवादीने आपल्या वाट्याच्या तीन जागांसाठी मार्च महिन्यातच अर्ज दाखल केले आहेत. मात्र, भाजपकडून सात नावांची यादी निश्चित न झाल्याने नियुक्त्यांचा संपूर्ण विषय रखडला आहे.
भाजपमध्ये या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असून, माजी नगरसेवक, निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार, उमेदवारी न मिळाल्याने माघार घेतलेले इच्छुक तसेच पक्षासाठी अनेक वर्षे काम करणारे पदाधिकारी अशा अनेकांनी दावेदारी केली आहे. त्यामुळे सात जागांसाठी पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, पक्षासाठी वर्षानुवर्षे योगदान देणाऱ्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी मागणी भाजपमधील एका गटाने केली आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली असून, सातही जागांवर जुन्या कार्यकर्त्यांचा विचार करण्याची भूमिका मांडण्यात आली आहे.




Total Users : 241172