शबनम न्यूज | प्रतिनिधी
मोशी परिसरात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळा प्रकल्पातील सुशोभीकरण व विद्युत कामांसाठी स्थायी समितीने मंजूर केलेल्या सुमारे ५० कोटी रुपयांच्या खर्चावरून वाद निर्माण झाला आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केला आहे.
या प्रकरणाच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात विरोधी पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच इतर विरोधी पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात कोणताही भ्रष्टाचार होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी मांडली.
स्थायी समितीच्या बैठकीत पुतळ्याच्या सुशोभीकरण आणि विद्युत कामांसाठी ५० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र या कामाच्या अंदाजपत्रकात मोठी तफावत असून टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
यापूर्वी या विषयाला स्थगिती देण्याची मागणी करत शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शविला होता. त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने या विषयाला तीव्र विरोध केला. मात्र चर्चा आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखेरीस हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
आज झालेल्या आंदोलनात माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेविका सुलभाताई उबाळे , राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे, यश साने, पंकज भालेकर, शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे, नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी “संभाजी महाराजांच्या नावावर भ्रष्टाचार चालणार नाही” अशा घोषणा देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच या प्रकल्पातील सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्याचा आणि कामाच्या खर्चाची चौकशी करण्याचा इशाराही विरोधी पक्षांनी दिला.



