पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनियल अॅपवर ओळख करून लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल ३१ लाख २० हजार २५७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर २०२४ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दळवीनगर, चिंचवड येथील मातृछाया निवास येथे राहणाऱ्या महिलेची आरोपीशी ऑनलाइन ओळख झाली. आरोपीने शादी डॉट कॉम या अॅपवरून संपर्क साधून लग्नाचे आमिष दाखवत महिलेचा विश्वास संपादन केला.
यानंतर विविध कारणे सांगून आरोपीने महिलेवर पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. तसेच आयसीआयसीआय बँकेमार्फत प्री-अप्रूव्हल लोन, ओव्हरड्राफ्ट सॅलरी लोन आणि NAVI अॅपद्वारे ऑनलाइन कर्ज घेण्यास भाग पाडले. या कर्जांचे सर्व हप्ते आपण भरू असे सांगून आरोपीने पैसे घेतले. मात्र त्यानंतर हप्ते न भरता आणि पैसे परत न करता महिलेची ३१,२०,२५७ रुपयांची फसवणूक केली.
या प्रकरणी जयेश पाटील उर्फ आदर्श प्रशांत म्हात्रे (रा. लोअर परेल, मुंबई तसेच कवडे हाशिवरे, कुरुळ, आरसीएफ कॉलनी, अलिबाग, रायगड) याच्याविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.



