spot_img
spot_img
spot_img

शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा देण्याचे आमिष; सायबर गुन्ह्यात २.०९ कोटींची फसवणूक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

शेअर ट्रेडिंग मध्ये १० ते १५ टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल २ कोटी ९ लाख ३० हजार ५३७ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत घडला.

याप्रकरणी एका पुरुष फिर्यादीने आपल्या वडिलांच्या वतीने तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना व्हॉट्सअॅपवर “5paisa Private Advisory” आणि “L781-5paisa Customer Service Center” या नावाच्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर आरोपींनी शेअर ट्रेडिंग आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळेल असे सांगून विश्वास संपादन केला.

आरोपींनी फिर्यादीला लिंक पाठवून “5 PASPMTA” नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. या अॅपद्वारे विविध शेअर्स आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगण्यात आले. आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादीच्या वडिलांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले.

संबंधित अॅपवर खोटा नफा दाखवून त्यांना अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले.
यादरम्यान फिर्यादीच्या वडिलांकडून एकूण २,०९,३०,५३७ रुपये ७२ पैसे विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेत आर्थिक फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ०८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) व ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात एका महिला आरोपीसह गौरव नावाच्या व्यक्तीचा तसेच संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन आणि विविध बँक खातेदारांचा समावेश असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!