spot_img
spot_img
spot_img

दिवसा घरफोडी करणारी महिला जेरबंद; ८ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त, दोन गुन्हे उघड

गुन्हे शाखा युनिट-१ ची कौशल्यपूर्ण कारवाई; २०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली आहे. तिच्याकडून सुमारे ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून या कारवाईत घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) व ३३१ (३) अन्वये २५ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादी यांच्या घरातून सुमारे ५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार होती. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-१ कडे देण्यात आला.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी सांगवी ते वारजे माळवाडी परिसरातील २०० ते २५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.

त्यातून ही घरफोडी एका महिलेने केल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमन दत्ता लोंढे (वय ३५, रा. रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) हिला ताब्यात घेतले.

चौकशीत तिने चोरीची कबुली दिल्यानंतर तिला अटक करून तिच्याकडून ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

तपासात आरोपी महिलेने ऑक्टोबर २०२५ मध्ये केलेल्या आणखी एका घरफोडीची कबुली दिली. त्यानुसार सांगवी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४३४/२०२५ हा गुन्हाही उघड झाला आहे.

तपासात असेही समोर आले की, अनेक लोक बाहेरगावी जाताना घराच्या बाहेरच चावी ठेवून जातात. अशा घरांवर नजर ठेवून आरोपी महिला चावी शोधून घरात प्रवेश करून चोरी करत होती.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सपोनि दत्तात्रय गुळीग, पोउनि कर्मराज गावडे, संतोष इंगळे, महिला पोलीस हवालदार उषा दळे, पोहवा महादेव जावळे, शिवराम भोपे, अजय डगळे, जयवंत राऊत, देवा राऊत, विजय शेळकंदे, दिपक तांदळे, तेजस भालचिम, संदेश देशमुख, खेडकर, विजय जानराव आदींच्या पथकाने केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!