प्रतिनिधी | युनूस खतीब
काळेवाडी फाटा सिग्नलवर अल्पवयीन मुलाने भरधाव टेम्पो चालवत अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या अपघातात काहीजण जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मार्च रोजी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास काळेवाडी फाटा सिग्नल, रहाटणी येथे हा प्रकार घडला. जीवन तानाजी यादव (वय १७, रा. स्वामी समर्थ कॉलनी, काळेवाडी) हा कोणताही वाहन परवाना नसताना टेम्पो (एमएच ०४ जीएफ ९०२५) भरधाव वेगात चालवत आला. त्याने सिग्नलवरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करत फिर्यादी मनिषकुमार ठाकूर यांच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीसह होंडा सिटी कार, रिक्षा, स्विफ्ट कार, हुंदाई आय-१० आणि होंडा शाईन या वाहनांना धडक दिली.
या अपघातात फिर्यादीसह रिक्षा चालक व दुचाकीस्वार जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन चालविण्यास दिलेल्या महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेटे करत आहेत.



