प्रतिनिधी | युनूस खतीब
भांबोली गाव हद्दीत चाकण-तळेगाव रस्त्यावर टेम्पो आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी दुपारी सुमारे ३.४० वाजण्याच्या सुमारास डी.वाय. पॉवर कंपनीजवळ हा अपघात झाला. आरोपी राजू बाबू मसळे (वय ४०, रा. आंबेठाण, ता. खेड) याने त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड टेम्पो (एमएच १४ एलएक्स २०४७) भरधाव व निष्काळजीपणे चालवत चाकणहून तळेगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच १४ केएक्स १२५४) जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार मनोहर शिवराम मेंगळे (वय ३६) आणि त्यांच्या मागे बसलेल्या गीता मनोहर मेंगळे (वय ३४, दोघेही रा. भांबोली, मळकाई वस्ती) यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी हरीभाऊ शिवराम मंगळे (वय ३९) यांनी फिर्याद दिली असून उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.



