शबनम न्यूज | प्रतिनिधी
बालेवाडी परिसरातील VIBGYOR शाळेजवळ विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेली धूम्रपानाची प्रवृत्ती चिंताजनक ठरत आहे. शाळेच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पानटपऱ्यांमुळे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शाळेच्या युनिफॉर्ममध्येच सिगारेट ओढताना दिसत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे शाळेजवळील सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे हे प्रकार घडत असूनही संबंधित प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शाळेच्या परिसरात अशा प्रकारे अल्पवयीन मुलांकडून धूम्रपान होत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या आसपास पानटपऱ्यांवर सहजपणे सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध होत असल्याने काही विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर किंवा मधल्या सुट्टीत तिथे जाऊन धूम्रपान करताना दिसतात. काही वेळा विद्यार्थिनी देखील युनिफॉर्ममध्येच धूम्रपान करताना दिसल्याने हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे.
कायद्यानुसार शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. तरीही बालेवाडी येथील या शाळेजवळ पानटपरी सुरू असल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणाची दखल घेऊन महापालिका, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, तसेच शाळेजवळील पानटपऱ्यांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पालकांकडून होत आहे.



